हिंदुस्थानची अजिंक्यअष्टमी! आशिया कपमध्ये हिंदुस्थानी महिलांनी आठव्यांदा मारली बाजी
आशिया चषकात हिंदुस्थानी महिलाच जिंकतात हे आठव्यांदा दाखवून देताना श्रीलंकन महिला संघाचा ७२ धावांनी पराभव केला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या झंझावती अर्धशतके आणि शतकी सलामीच्या जोरावर हिंदुस्थानने दिलेले १८४ धावांचे आव्हान श्रीलंकन महिला संघाला झेपलेच नाही आणि श्री चरणी आणि दिप्ती शर्माच्या प्रभावी फिरकीने त्यांचा डाव १११ धावांत संपवत आठव्यांदा आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आठव्यांदा जेतेपद संपादले. विशेष म्हणजे श्रीलंकेला सहाव्यांदा अंतिम फेरीत हरवण्याचाही पराक्रम रचला.
हिंदुस्थानच्या १८४ धावांचा पाठलाग करताना क्रांती गौडने पहिल्याच षटकांत इमेशा दुलानीची यष्टी वाकवली. त्यानंतर चमारी अटापट्ट (३६) आणि विश्मी गुणरत्ने (२०) यांनी ५८ धावांची भागी रचून विजयाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण दिप्तीने ४ चेंडूंत या दोघांची विकेट काढत लंकेच्या पाठलागातली हवाच काढून टाकली. पुढे श्री चरणीने ४ विकेट घेत हिंदुस्थानचे जेतेपद निश्चित केले; पण लंकेचा डाव संपवायला हिंदुस्थानला शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने २० षटकांत ५ बाद १८३ धावा फटकावल्या. सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत हिंदुस्थानसाठी ७७ चेंडूंत १२९ धावांची खणखणीत सलामी दिली. शफालीने अवघ्या २४ चेंडूंत अर्धशतक ठोकत महिला आशिया कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. तिने ३९ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. स्मृतीनेही आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवत ३९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
हिंदुस्थानी संघ एकवेळ दोनशेच्या उंबरठ्यावर पोहोचण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात श्रीलंकेने जोरदार पुनरागमन केले. मिथाली अयोध्या, चमारी अटापट्टू आणि चमुदी प्रबोधा यांनी प्रत्येकी एक विकेट टिपत हिंदुस्थानच्या धावांना काहीसा लगाम घातला. श्रीलंकेने दोन फलंदाज धावबादही करत हिंदुस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. कर्णधार हरमनप्रीत कौरने १४, तर ऋचा घोषने १७ धावा केल्या. अखेर हिंदुस्थानने १८३ धावांपर्यंत मजल मारत श्रीलंकेसमोर विजेतेपदासाठी १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Comments are closed.