अभिषेकने जिंकले दिल अन् दिल्ली! अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत हिंदुस्थानची विजयी सलामी
अभिषेक शर्माच्या ३२ चेंडूंतील ८२ धावांच्या खेळीने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजयी सलामीसह दिल अन् दिल्ली जिंकली. अफगाणिस्तानचे १५७ धावांचे आव्हान अभिषेक आणि इशान किशनने १२१ धावांची वादळी भागी रचत हिंदुस्थानला ७ विकेट आणि ३८ चेंडू राखून सहजसुंदर विजय मिळवून दिला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
अफगाणी आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन (१०) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेकने अफगाणी मार्याच्या चिंधड्या उडवत ७चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडला. इशानने ३३चेंडूत ४२ धावा केल्या. दोघे बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि तिलक वर्माने पुढच्या षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी अफगाणिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच गडगडायला सुरुवात झाली. रहमानुल्ला गुरबाजला जसप्रीत बुमराने अवघ्या २ धावांवर माघारी धाडले. एका टप्प्यावर अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ४३ अशी झाली होती. मात्र, अझमतुल्ला ओमरझाईने झुंजार फलंदाजी करत नाबाद ६४ धावा ठोकल्या. मोहम्मद नबीनेही ३३ धावांची साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानला १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. ओमरझाईने ४४ चेंडूंत ६४ धावा फटकावल्या. हिंदुस्थानी गोलंदाजांमध्ये अर्शदीपने १९ धावा देत तीन विकेट टिपले तर जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
Comments are closed.