Asian games 2026 – रिंगमध्ये हिंदुस्थानी वादळ; लव्हलिना, परवीनापाठोपाठ अंकुशचाही गोल्डन पंच, 76 पदकांसह पाचव्या स्थानावरहिंदुस्थानची झेप

हिंदुस्थानच्या बॉक्सर्सने शुक्रवारी अविस्मरणीय कामगिरी करत देशाला तीन सुवर्णपदकांची कमाई करून दिली. स्टार महिला बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने सोनेरी बोहोनी केली. त्यानंतर परवीन हुडाने अटीतटीच्या लढतीत झुंजार खेळ करत सुवर्णपदकाला गवसणी घातली, त्यानंतर अंकुश पंघाल सुवर्णपदकाला गवसणी घालत गोल्डन हॅटट्रिक साजरी केली. हिंदुस्थानची बॉक्सिंग मोहीम यावेळी तीन सुवर्ण आणि तीन कांस्यपदकांसह संपली. हिंदुस्थानने आतापर्यंत एकूण ७६ पदके जिंकली असून त्यांनी पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

अंकुशने इतिहास रचला

हिंदुस्थानचा बॉक्सर अंकुश पंघालने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नागोया येथील निशिओ जिम्नॅशियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अंकुशने दक्षिण कोरियाच्या किम मिनसेओंगचा 4-0 ने पराभव केला.

तिसऱ्या फेरीतही काही बदल झाला नाही

तिसऱया फेरीतही अंकुशने आपली रणनीती बदलली नाही. त्याने बचाव आणि हल्ला यांच्यात अचूक संतुलन राखले. या हिंदुस्थानच्या बॉक्सरने किमचे हल्ले चुकवले आणि योग्य वेळी प्रतिहल्ले केले. अंकुशने तिसरी फेरी 4-1 ने जिंकली आणि 4-0 असा निर्णय आपल्या बाजूने निश्चित केला

अंकुशचे सुरुवातीपासूनच वर्चस्व

अंतिम सामन्यात अंकुशने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने पहिल्या फेरीत आपल्या वेगवान आणि अचूक ठोक्यांनी किमवर दबाव आणला. हिंदुस्थाननी बॉक्सरने ही फेरी 4-1 ने जिंकली. पहिल्या फेरीत चेतावणी मिळाल्यामुळे किमचे गुणही कमी करण्यात आले. दुसऱया फेरीत अंकुशची कामगिरी अधिक प्रभावी ठरली. त्याने आपल्या एकामागोमाग एक ठोसे मारून संधी निर्माण केल्या आणि कोरियन बॉक्सरच्या हल्ल्यांना प्रतिहल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले. किमने काही चांगले ठोसे मारले, पण अंकुशच्या बचावात्मक तंत्राने आणि प्रतिहल्ल्यांनी त्याला सातत्याने दूर ठेवले. दुसऱया फेरीत पाचही पंचांनी अंकुशला आघाडी दिली.

हिंदुस्थानने तीन कांस्यपदकेही जिंकली

हिंदुस्थानने आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग मोहिमेत तीन कांस्यपदकेही जिंकली. कपिल पोखरियाने पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. नरेंद्र बरवालने पुरुषांच्या 90 किलोवरील गटात कांस्यपदक जिंकले. प्रियांका घंघासनेही महिलांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. हे तिन्ही बॉक्सर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटच्या चार लढतींमध्ये पराभूत झाल्यामुळे त्यांची मोहीम कांस्यपदकांवरच संपली. याप्रकारे हिंदुस्थानने बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण आणि तीन कांस्यपदकांसह एकूण सहा पदके जिंकली.

अटीतटीच्या लढतीत परवीनने सुवर्णपदक जिंकले

अंकुशच्या आधी परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. परवीनने अटीतटीच्या लढतीत चायनीज तैपेईच्या चेन निएन-चिनचा 3-2 असा पराभव केला. परवीनने अंतिम फेरीची सुरुवात दमदार केली आणि पहिली फेरी 5-0 ने जिंकली. पण चेनने दुसऱया फेरीत जोरदार पुनरागमन केले आणि पाचही पंचांनी तिच्या बाजूने निकाल दिला. निर्णायक तिसऱया फेरीत परवीनने संयम राखला आणि ती फेरी 3-2 ने जिंकली. याप्रकारे 3-2 च्या विभाजित निर्णयाने परवीनला विजेती घोषित करण्यात आले आणि तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले. या विजयासह परवीन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी तिसरी  महिला बॉक्सर ठरली. यापूर्वी  मेरी कोमने 2014 च्या इंचिओन आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

बॉक्सिंग सोडण्याच्या उंबरठय़ावर होती…

वाढदिवशी लव्हलिनाने स्वतःलाच दिली सुवर्ण भेट

पॅरिस ऑलिम्पिकमधील अपयशानंतर खचलेल्या बोरगोहेन लव्हलिनाने बॉक्सिंग सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा तिची लढाई  प्रतिस्पर्ध्याशी नव्हे तर स्वतःशीच सुरू होती. पण ना तिने बॉक्सिंग सोडले ना रिंग सोडली. आज तिने त्याच रिंगमध्ये आपला 29 वा जन्मदिन सोनेरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण इतिहास लिहिला.

2 ऑक्टोबरला वयाची एकोणतिशी गाठणाऱया लव्हलिनासमोर 75 किलो गटाच्या अंतिम लढतीत चीनच्या बाओ झियीचे आव्हान होते. निकाल लागला तेव्हा पंचांचा कौल एकमुखी होता. लव्हलिना 5-0.  तिच्या गळय़ात सुवर्णपदक आले आणि मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यचा रंग अखेर बदलला.

या सुवर्णामागची कहाणी फक्त एका सामन्याची नाही. पॅरिस ऑलिम्पिकनंतर लव्हलिनाने बॉक्सिंगमधून निवृत्तीचा विचार केला होता. त्यानंतर तिने वर्षभराचा ब्रेक घेतला. तिचे पुनरागमनही सहज झाले नाही. जागतिक स्पर्धेत लवकर बाहेर पडणे आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य अशा धक्क्यांनी तिची परीक्षा घेतली. तरीही एक गोष्ट तिच्या मनात ठाम होती की, आशियाई पदकाचा रंग बदलायचा.

अखेर अंतिम सामन्यात पहिल्या दोन फेऱयांत आघाडी घेतल्यानंतर शेवटची फेरी तिच्यासाठी कठीण ठरली. पण लव्हलिनाने संयम सोडला नाही. तिच्या मते, अशा क्षणी मानसिक ताकदच निर्णायक ठरते. मेरी कोमनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग सुवर्ण जिंकणारी लव्हलिना दुसरी हिंदुस्थानी महिला ठरली. रिंग सोडण्याचा विचार करणारी मुलगी अखेर रिंगमधून ‘गोल्डन गर्ल’ म्हणून बाहेर पडली.

Comments are closed.