Asian Games 2026 – हिंदुस्थानची डरकाळी! जपानचा धुव्वा उडवत नवव्या सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाने जपानच्या बत्त्या गुल करत आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि पहिल्या हाफमध्ये 31-9 अशी जबरदस्त आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये घेतलेली पकड संघाने आणखी मजबूत केली आणि 49-24 अशा फरकाने जपानला धुळ चारली. विशेष म्हणजे हिंदुस्थानचा जपानविरुद्धचा हा सलग आठवा विजय ठरला आहे.

अयान लोचब आणि देवांक दलाल या पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट रेडिंग आणि डिफेन्सच्या जोरावर जपानला सुरुवातीपासूनच बॅकफुटवर ढकलले. याचा फायदा संघाच्या इतर खेळाडूंनी उचलला. दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाचा खेळ किंचित मंदावला मात्र, त्यांनी सामन्यावरील आपले नियंत्रण सोडले नाही. दुसऱ्या हाफमध्ये हिंदुस्थानने 18 गुण जोडले, तर जपानने सुधारित खेळ करत 15 गुणांची कमाई केली. कर्णधार पवन सहरावत अपेक्षेप्रमाणे चमकू शकला नाही, परंतु असलम इनामदारने दुसऱ्या हाफमध्ये दमदार खेळ केला. हिंदुस्थानने एकूण 8 ऑल-आउट पॉइंट्स आणि 2 सुपर टैकल मिळवले. या विजयानंतर आता टीम इंडियाचा पुढचा सामना मंगळवारी (22 सप्टेंबर 2026) दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.

एशियन गेम्समध्ये आतापर्यंत 9 वेळा कबड्डीचा समावेश झाला असून, त्यापैकी 8 वेळा हिंदुस्थानच्या पुरुष संघांने सुवर्णपदक पटकावले आहे. 2018 चा अपवाद वगळता हिंदुस्थानने नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून, चालू स्पर्धेत सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली संघ नववे सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, एशियन गेम्स 2026 मध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत एकूण 6 पदके (4 रौप्य आणि 2 कांस्य) जिंकली असून, गुणतालिकेत संघ सध्या 10 व्या स्थानावर आहे.

Comments are closed.