मॅरेथॉनचे प्रकार किती आणि कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मॅरेथॉन म्हटले की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर 42.195 किलोमीटरची शर्यत उभी राहते. मात्र आजच्या काळात रनिंगचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून वेगवेगळ्या अंतरांवर, वेगवेगळ्या भूप्रदेशांवर आणि वेगवेगळ्या स्वरूपात धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे मॅरेथॉन आणि लाँग-डिस्टन्स रनिंगचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.
अनेकांना मॅरेथॉनमधील नियमीत मॅरेथॉन व अल्ट्रा मॅरेथॉन यांमधील फरक समजत नाही. तसेच टाईम्ड मॅरेथॉन म्हणजे नक्की काय? हे माहित नसते. या लेखात मॅरेथॉनच्या सर्व प्रकारांची माहिती सविस्तर देत आहोत.
1) फुल मॅरेथॉन
42.195 किलोमीटर अंतराची शर्यत म्हणजे फुल मॅरेथॉन. जगभरातील अधिकृत रोड मॅरेथॉनसाठी हेच प्रमाणित अंतर आहे. रोड रनिंगमध्ये मॅरेथॉन ही स्वतंत्र प्रमुख श्रेणी मानली जाते. फुल मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी धावपटूला दीर्घकाळ धावण्याची क्षमता, योग्य पेसिंग, पोषण, हायड्रेशन आणि मानसिक तयारी आवश्यक असते.
2) हाफ मॅरेथॉन
21.0975 किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉन. हे फुल मॅरेथॉनच्या अर्धे अंतर आहे. अनेक नव्या धावपटूंसाठी हाफ मॅरेथॉन हा फुल मॅरेथॉनच्या दिशेने जाण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. हाफ मॅरेथॉनमध्येही वेग आणि सहनशक्ती दोन्ही महत्त्वाचे असतात. World Athletics च्या रोड रनिंगमध्ये हाफ मॅरेथॉन ही प्रमुख स्पर्धांपैकी एक आहे.
3) 10K, 5K, 3K
हे मॅरेथॉनचे प्रकार नसून तरिही नुकतीच सुरुवात केलेल्या धावपटूंसाठी एक चांगला धावण्याचा प्रकार समजला जातो. अनेक आयोजक अशा अंतरांचा मॅरेथॉनमध्ये समावेश करतात. शक्यतो ही अंतर रोड मॅरेथॉनमध्ये पहायला मिळतात.
4) अल्ट्रा मॅरेथॉन
42.195 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची शर्यत अल्ट्रा रनिंग किंवा अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. 50 किमी, 100 किमी, 100 मैल अशा अंतरांच्या अल्ट्रा शर्यती लोकप्रिय आहेत. अल्ट्रा रनिंगमध्ये केवळ अंतरच महत्त्वाचे नसते. अनेक स्पर्धा ठरावीक वेळेसाठीही आयोजित केल्या जातात. उदाहरणार्थ 6 तास, 12 तास किंवा 24 तासांच्या शर्यती. काही अल्ट्रा स्पर्धा अनेक दिवस चालतात.
5) रोड मॅरेथॉन
शहरातील रस्ते किंवा पक्क्या रस्त्यांवर होणारी मॅरेथॉन म्हणजे रोड मॅरेथॉन. मुंबई, पुणे, दिल्ली, लंडन, बोस्टन यांसारख्या शहरांमध्ये होणाऱ्या मोठ्या मॅरेथॉन या प्रामुख्याने रोडवर आयोजित केल्या जातात. रोड मॅरेथॉनमध्ये कोर्सचे अधिकृत मोजमाप, सुरुवात आणि शेवटाचे अंतर, तसेच इतर तांत्रिक निकष महत्त्वाचे असतात. World Athletics कडून प्रमाणित रोड रेससाठी विशिष्ट नियम आहेत.
6) ट्रेल रन
नैसर्गिक मार्ग, जंगल, डोंगरवाटा, मातीचे रस्ते किंवा खडकाळ परिसरातून होणाऱ्या शर्यतींना ट्रेल रनिंग म्हटले जाते. अशा स्पर्धांमध्ये रस्त्यावरील वेगापेक्षा भूप्रदेशाशी जुळवून घेण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते. ट्रेल रनमध्ये चढ-उतार, दगड, माती, अरुंद वाटा आणि हवामान यामुळे प्रत्येक किलोमीटरचा अनुभव वेगळा असू शकतो.
7) माउंटन रनिंग
डोंगराळ भागातील मोठ्या चढ-उतारांसह होणाऱ्या शर्यतींना माउंटन रनिंग म्हणतात. यात चढाईची क्षमता, उतरताना नियंत्रण आणि ताकद यांना विशेष महत्त्व असते.
World Athletics च्या Mountain and Trail Running स्पर्धांमध्ये uphill, classic up-and-down, short trail आणि long trail असे वेगवेगळे प्रकार आहेत.
8) ट्रेल आणि अल्ट्रा यांचे मिश्र स्वरूप
अनेक अल्ट्रा शर्यती रोडवरच होतील असे नाही. काही अल्ट्रा स्पर्धा जंगल, डोंगर, ट्रेल, रोड किंवा या सर्वांच्या मिश्र मार्गावर होतात. त्यामुळे ट्रेल अल्ट्रा आणि माउंटन अल्ट्रा यांसारख्या स्पर्धाही मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. World Athletics नुसार अल्ट्रा रेस रोड, ट्रॅक आणि ट्रेल अशा विविध ठिकाणी होऊ शकतात.
9) वेळेवर धावणे
अल्ट्रा रनिंगमध्ये काही स्पर्धा अंतरावर आधारित नसतात. धावपटूने ठरावीक वेळेत शक्य तितके अंतर पूर्ण करायचे असते. उदाहरणार्थ 6 तास, 12 तास किंवा 24 तासांची रन.यामध्ये अंतिम निकाल धावपटूने ठरावीक वेळेत कापलेल्या अंतरावर ठरतो.
मग मॅरेथॉनचे प्रकार किती?
याचे एकच ठरावीक उत्तर नाही. कारण अंतरानुसार पाहिले तर हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन आणि अल्ट्रा रनिंग असे प्रकार दिसतात; तर भूप्रदेशानुसार रोड, ट्रेल आणि माउंटन रनिंग असे प्रकार करता येतात.
म्हणून धावपटूने स्पर्धेत नोंदणी करण्यापूर्वी फक्त अंतर पाहू नये. अंतर, चढ-उतार, भूप्रदेश, कट-ऑफ टाइम, हवामान आणि कोर्सची रचना यांचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आज मॅरेथॉन हा केवळ 42.195 किलोमीटरचा खेळ राहिलेला नाही. रोडपासून डोंगरापर्यंत आणि 5 किलोमीटरपासून 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत रनिंगचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक धावपटू आपल्या क्षमतेनुसार आणि उद्दिष्टानुसार योग्य प्रकारची शर्यत निवडू शकतो.
येथे क्लिक करुन जाणून घ्या…
मॅरेथॉन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या इतिहास, प्रकार आणि रंजक माहिती
Comments are closed.