Asian Games 2026: श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये! 124 धावांनी मिळवला दणदणीत विजय

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन गेम्स 2026 मधील पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत भारताने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, श्रीलंकेचा संपूर्ण संघ 9.5 षटकांत अवघ्या 45 धावांत गारद झाला. आता सुवर्णपदकासाठी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही, अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला धक्का बसला आणि अभिषेक शर्मा 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही 7 धावा करून बाद झाला. मात्र, वैभव सूर्यवंशीने एका बाजूने आक्रमक फलंदाजी केली. त्यालाही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही, तो 21 चेंडूंत 38 धावा करून बाद झाला.

वैभव बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही 13 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने 46 चेंडूंत नाबाद 80 धावांची धडाकेबाज खेळी केली. इशानच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत 7 बाद 169 धावांची मजल मारली. श्रीलंकेकडून कर्णधार सहन अरच्चिगे आणि थरिंदू रत्नायके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर वनुजा सहन, लसिथ क्रूसपुले आणि नुवानिदू फर्नांडो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांना मोठा धक्का बसला; केवळ 2 धावांवर त्यांनी तीन विकेट्स गमावल्या. सिनेथ जयवर्धने, लसिथ क्रूसपुले आणि सोहन डी लिव्हेरा हे तिघेही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. ही पडझड इथेच थांबली नाही. अवघ्या 18 धावांतच श्रीलंकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी संघाला या धक्क्यातून पुन्हा सावरता आले नाही. शेवटी संघ 9.5 षटकांत 45 धावांत सर्वबाद झाला.

Comments are closed.