हरयाणवी निवडीने पेटले कबड्डीचे मैदान! महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या न्यायासाठी कबड्डीच्या अर्जुनवीरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे धाव
>> मंगेश वरवडेकर
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या गुणवान आणि धुरंधर खेळाडूंना डावलून वशिलेबाजांची वर्णी लावल्यानंतरही महाराष्ट्राचे कबड्डी संघटक मूग गिळून गप्प बसले होते. मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज कबड्डीपटूंनी आता थेट केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे धाव घेतली असून संघ निवड पारदर्शक आणि गुणवत्तेवर व्हावी, अशी मागणी केली. हिंदुस्थानच्या पाच अर्जुन पुरस्कार विजेत्या दिग्गजांनी क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरण (साई) आणि हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेलाही (आयओए) याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यामुळे हे प्रकरण आणखी तापणार हे निश्चित आहे.
दिग्गजांनी केला पर्दाफाश
महाराष्ट्राने 72 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतपद पटकावले. यात आदित्य शिंदे आणि शिवम पठारेने स्पर्धा गाजवली. आदित्यने तर 57 गुण मिळवत स्पर्धेत दुसऱया क्रमांकाचे गुण मिळवले. एवढेच नव्हे तर, त्याने प्रो कबड्डीत 159 गुणांची कमाई करत आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची किमया दाखवली होती. शिवमने राष्ट्रीय स्पर्धेत अष्टपैलू चमक दाखवत आपलाही सुसाट खेळ दाखवला होता. त्याचबरोबर रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पंकज मोहिते आणि शुभम शिंदे यांच्या कामगिरीलाही तोड नव्हती. त्यांनी प्रो कबड्डीचाही हंगाम गाजवला. तरीही त्यांच्यापेक्षा कमी कामगिरी असलेल्या खेळाडूंची रेल्वे संघातून राष्ट्रीय संघात एण्ट्री झाली. ही वशिलेबाजी या दोघांच्या खेळाचा अपमान आणि अन्याय करणारी होती. निवड झालेल्या खेळाडूंची कामगिरी दुय्यम असूनही ते राष्ट्रीय संघात कसे बसले, असा सवाल उठवत दिग्गजांनी संघ निवड प्रक्रियेत हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही
केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी संघ निवडीसाठी आयओए आणि साईच्या मदतीने समिती नेमली तर झालेला प्रकार सर्वांसमोर येईल. स्पर्धा सुरू व्हायला अद्याप 3 आठवडे बाकी आहेत. मांडवीय यांनी ठोस पावले उचलली तर हिंदुस्थानी संघात गुणवान खेळाडूंना नक्कीच न्याय मिळेल. अजूनही वेळ गेलेली नाही. क्रीडामंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कबड्डीत सुरू असलेल्या कबड्डीच्या वशिलेबाजीलाही चाप बसेल, असे राजू भावसार म्हणाले.
…म्हणूनच हिंदुस्थानचा युनियन हरियाणवी?
हिंदुस्थानी कबड्डी संघात निवड ही गुणवत्ता आणि कामगिरीवरच होते असे नाही. या संघ निवडीशी काही आर्थिक समीकरणे असतात. जो खेळाडू ती आर्थिक समीकरणे पूर्ण करण्याची हमी देतो त्याचीच संघात वर्णी लागते, असे सारेच दबक्या आवाजात बोलतात. आजही आशियाई कबड्डीमध्ये हिंदुस्थानला इराणशिवाय पुणीही आव्हान देऊ शकत नाही. तरीही इराणचा संघ उपविजेताच ठरत आहे. हिंदुस्थानी पथकाला कबड्डीची दोन्ही सुवर्ण पदके हमखास असल्यामुळे विजेत्या खेळाडूंवर राज्य सरकारांकडून कोटय़वधींचे रोख पुरस्कार जाहीर केले जातात. त्यातच हरयाणा सरकारने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्यांना 5 कोटी रुपयांचे इनाम आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघात 12 पैकी 8 हरयाणाच्या खेळाडूंची वर्णी लावण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र महाराष्ट्र सरकारकडून सुवर्ण विजेत्यांना केवळ एक कोटीचाच पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे हरयाणाच्या खेळाडूंचीच निवड आर्थिक लाभाची असल्याचे समीकरण जुळवत कबड्डीतल्या काही दलालांच्या संगनमताने हिंदुस्थानचा हरयाणवी संघ निवडला गेला असल्याची शंका कबड्डीच्या जाणकारांकडून व्यक्त केली गेली आहे.
दिले. 'चेहरा'च्या वृत्ताने कबड्डीच्या दिग्गजांचा पुढाकार
गुरुवारी दै. ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या ‘आशियाई स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा हरयाणवी संघ’ या बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. राष्ट्रीय संघ निवडीत महाराष्ट्राच्या खेळाडूंवर होत असलेल्या अन्यायाला समोर आणताच राज्यातील कबड्डीचे वातावरण अक्षरशः पेटले. सत्तेसाठी संघटक थंड बसले असले तरी आपल्या खेळाडूंसाठी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, राजू भावसार, अशोक शिंदे, पंकज शिरसाट, माया मेहेर आव्रे यांच्यासह विजया राणे आणि संजय सूर्यवंशी हे माजी कबड्डीपटू पंकज मोहिते, शुभम शिंदे, आदित्य शिंदे आणि शिवम पठारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवेदनाद्वारे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवडीत हस्तक्षेप करून ती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष घेतली जावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
Comments are closed.