Vithya Ramraj Story – फाटक्या शूजपासून ऐतिहासिक विक्रमापर्यंत! विथ्या रामराजचा संघर्षमय प्रवास
>> गणेश पुराणिक
ॲथलेटिक्समध्ये आपल्या वेगाने आणि जिद्दीने वेगळी ओळख निर्माण करणारी धावपटू विथ्या रामराज देशभरात चर्चेत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकासह तीन पदक आणि पी.टी. उषा यांच्या 42 वर्षांपूर्वीच्या राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकण्याचा पराक्रम यामुळे विथ्याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, आज मिळणारी प्रसिद्धी, चाहत्यांचे प्रेम आणि सन्मान यामागे अनेक वर्षांचा संघर्ष, आर्थिक अडचणी, दुखापती, अश्रू आणि कुटुंबीयांचा मोठा त्याग दडलेला आहे. फाटक्या शूजमध्ये सराव करणाऱ्या विथ्याने राष्ट्रीय विक्रम करत ॲथलेटिक्सच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले आहे.
पी.टी. उषांचा 42 वर्षांचा विक्रम मोडला
विथ्या रामराजच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिग्गज धावपटू पी.टी. उषा यांच्या नावावर असलेला 400 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम मोडणे. 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पी.टी. उषा यांनी 55.42 सेकंदांची वेळ नोंदवली होती. तब्बल 42 वर्षे हा विक्रम हिंदुस्थानच्या ॲथलेटिक्समध्ये कायम होता. 2023 मध्ये विथ्याने या विक्रमाशी बरोबरी केली होती. मात्र, विक्रम मोडण्याचे तिचे स्वप्न तेथेच थांबले नाही. पुढील तीन वर्षे तिने या लक्ष्याचा पाठलाग केला. या प्रवासात तिच्यावर मोठे मानसिक दडपण होते. “मी कुठेही गेले, मग ती मुलाखत असो किंवा माध्यमांशी संवाद, प्रत्येकजण मला एकच प्रश्न विचारायचा की तू विक्रम कधी मोडणार?” असे विथ्याने सांगितले. सातत्याने होणारे प्रश्न, स्वतःकडून असलेल्या अपेक्षा आणि विक्रम मोडण्याचे दडपण यामुळे तिच्यासाठी हा काळ मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरला.
दुखापतींनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण जिद्द कायम राहिली
विक्रमाच्या दिशेने वाटचाल करताना विथ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 2024 मध्ये तिला पाठीची दुखापत झाली, तर 2025 मध्ये घोट्याच्या दुखापतीने तिच्या तयारीत अडथळा आणला. मात्र, या दुखापतींमुळे तिने हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिने पुन्हा मैदानावर पुनरागमन केले. मैदानावर उतरताना मन शांत ठेवणे आणि आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे यासाठी प्रशिक्षकांनी दिलेला सल्ला तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. अखेर 2026 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ऐतिहासिक कामगिरी करत पी.टी. उषा यांचा प्रदीर्घ काळ कायम असलेला राष्ट्रीय विक्रम मागे टाकला.
पदक जिंकल्यानंतर बाथरूममध्ये 2 तास रडली!
मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देणारी विथ्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अत्यंत भावूक आहे. तिच्या यशामागे किती वर्षांचा संघर्ष होता, याची जाणीव पदक मिळाल्यानंतर तिला अधिक तीव्रतेने झाली. हॉस्टेलमध्ये राहत असल्याने इतरांसमोर भावना व्यक्त करणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे पदक जिंकल्यानंतर तिने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतले. “मी माझ्या पदकांकडे पाहत जवळपास दोन तास सतत रडत होते. कोणाशी बोलावे, काय बोलावे हेच समजत नव्हते. हा प्रवास खूप दीर्घ आणि कठीण होता,” असे सांगताना विथ्या भावूक झाली.
वडिलांचा त्याग; स्वतः उपाशी राहून मुलीच्या शूजसाठी पैसे वाचवले
विथ्याच्या यशामागे तिच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. वडील चालक म्हणून काम करत होते. त्यांना महिन्याला साधारण 10 ते 15 हजार रुपये पगार मिळत होता. या उत्पन्नात तीन मुलींचा सांभाळ करणे आणि त्यांचे शिक्षण व इतर गरजा पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. शाळेतील पीटी शिक्षकांच्या सल्ल्यानुसार विथ्या आणि तिच्या जुळ्या बहिणीला चांगल्या क्रीडा संधी मिळाव्यात, यासाठी आईने त्यांना सरकारी क्रीडा वसतिगृहात दाखल केले. मात्र, तिथेही सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता.
धावपटूसाठी चांगले रनिंग शूज आणि स्पाइक्स अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेले शूज घेणेही कुटुंबाला परवडत नव्हते. त्यामुळे विथ्याला अनेकदा फाटलेल्या शूजमध्ये सराव करावा लागला. शूजना बँडेज गुंडाळून ती स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. या शूजमुळे तिच्या पायांना जखमा होत आणि अनेकदा पायांतून रक्तही यायचे. यावेळी विथ्याने वडिलांच्या त्यागाबद्दल एक भावनिक आठवण सांगितली. “माझ्यासाठी शूज घेता यावेत म्हणून वडील पैसे वाचवायचे. अनेकदा ते स्वतःचे जेवण टाळून फक्त एका कप चहावर दिवस काढायचे. ही गोष्ट मला अगदी अलीकडे समजली,” असे ती म्हणाली.
जुळ्या बहिणीने स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली
विथ्याच्या संघर्षात तिच्या जुळ्या बहिणीची साथही तितकीच महत्त्वाची ठरली. दोघींमध्ये अवघ्या एका मिनिटाचे अंतर आहे. मात्र, विथ्यामध्ये धावण्याची अधिक क्षमता आणि वेग असल्याचे तिच्या बहिणीने ओळखले होते. त्यामुळे स्वतःची क्रीडा कारकीर्द घडवण्याऐवजी तिने विथ्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा निर्णय घेतला. पुढे तिला आयकर विभागात नोकरी मिळाली. तिथून मिळणाऱ्या साधारण 32 हजार रुपयांच्या पगारातून ती विथ्याच्या प्रशिक्षणाचा, स्पाइक्सचा आणि प्रवासाचा खर्च उचलत होती. विथ्याने पदक जिंकावे, यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले. विशेष म्हणजे, तिने कधीही विथ्यावर पदक जिंकण्याची अट किंवा दबाव टाकला नाही. “ती माझ्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकते, हे मला माहीत होते. त्यामुळे तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्ने बाजूला ठेवली,” असे तिच्या बहिणीने सांगितले. विथ्या राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी धावत असताना तिची बहीणही तितकीच भावूक होती. “ती सुवर्णपदकासाठी धावत असतानाही मी स्क्रीनकडे पाहत नव्हते. माझे लक्ष फक्त त्या 54 सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमावर होते. तिने तो विक्रम मोडावा, एवढीच माझी प्रार्थना होती,” अशी आठवण तिने सांगितली.
रातोरात बदलले आयुष्य; 3 हजारांवरून थेट 1.4 लाख फॉलोअर्स
एकेकाळी फाटक्या शूजमध्ये धावणाऱ्या विथ्याच्या आयुष्यात आज मोठा बदल झाला आहे. तिच्या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. सुवर्णपदकानंतर अवघ्या एका रात्रीत तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स तीन हजारांवरून थेट 1 लाख 40 हजारांपर्यंत पोहोचले. शुभेच्छांचे असंख्य संदेश आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तिला फोन बंद करून शांत झोप घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. विमानतळावर चाहत्यांची गर्दी, घरी परतल्यानंतर होणारे स्वागत आणि विविध ठिकाणी मिळणारा सन्मान यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. मुंबई येथे आयोजित ‘हार्ट ऑफ गोल्ड’ या विशेष सत्कार सोहळ्यातही तिने या बदललेल्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. “पूर्वी माझ्या घरी कधी केक कापला जात नव्हता. पण आता विमानातसुद्धा माझ्यासाठी केक कापला जातो. या पदकांनी, विशेषतः सुवर्णपदकाने माझे आयुष्यच बदलून टाकले आहे. गेल्या महिन्यात मिळालेला हा अनुभव खूप आनंददायी आहे,” असे विथ्याने सांगितले.
महिला खेळाडूंच्या यशाबद्दल काय म्हणाली विथ्या?
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी महिला खेळाडूंनी पुरुष खेळाडूंपेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकण्याच्या कामगिरीबद्दल विथ्याला विचारण्यात आले. त्यावर तिने महिला आणि पुरुष खेळाडूंमध्ये कोणताही भेदभाव नसल्याचे स्पष्ट केले. “महिला खेळाडूंनी अधिक पदके जिंकली, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र, पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये कोणताही फरक नाही. दोघेही आपापल्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांनी चांगली कामगिरी केली, याचा मला आनंद आहे,” असे ती म्हणाली.
‘क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांतील खेळाडूंनाही ओळख मिळतेय’
हिंदुस्थानात क्रिकेटला मोठी लोकप्रियता असताना इतर खेळांतील खेळाडूंनाही प्रसिद्धी आणि सन्मान मिळणे गरजेचे आहे, असे मत विथ्याने व्यक्त केले. “खेळाडू म्हणून आता आम्हालाही देशभरात ओळख मिळत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो,” असे ती म्हणाली.
युवा खेळाडूंना दिला यशाचा मंत्र
स्वतःच्या संघर्षातून मोठे यश मिळवल्यानंतर विथ्याने नवोदित खेळाडूंनाही महत्त्वाचा संदेश दिला आहे. यश मिळवण्यासाठी संयम, सातत्य आणि स्वतःवरील विश्वास आवश्यक असल्याचे तिने सांगितले. “संयम ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि दररोज आपले 100 टक्के योगदान द्या,” असा मोलाचा सल्ला तिने युवा खेळाडूंना दिला.
Comments are closed.