IND Vs NZ 1st Test – तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला! केएल राहुलचे विक्रमी शतक, तर कर्णधार ‘नर्वस नाइन्टी’चा शिकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी धुरळा उडवून दिला आहे. फक्त धुरळाच नाही तर सामन्यावरही मजबूत पकड निर्माण केली असून तिसऱ्या दिवसा अखेर 4 गड्यांच्या मोबदल्यात 486 धावा चोपून काढत 198 धावांची आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. यशस्वी जयसवाल (85) आणि केएल राहुल यांनी संघाला अपेक्षित अशी धडाकेबाज सुरुवात करून दिली. केएल राहुलने तिसऱ्या दिवशी 136 धावांची दमदार खेळी साकारत कसोटी कारकीर्दीतील आपले 13 वे शतक पूर्ण केले. यासह तो हिंदुस्थानच्या सक्रिय कसोटी क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला असून, या यादीत 11 शतकांसह शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, केएल राहुल हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्व ‘सेना’ देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज बनला आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडमध्ये 4, दक्षिण आफ्रिकेत 2, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी 1 शतक नोंदवले होते.

दुसरीकडे, शुभमन गिल 98 धावांवर बाद होऊन ‘नर्वस नाइन्टी’चा शिकार ठरला. कसोटी डावात नर्वस नाइन्टीमध्ये अडकणारा तो 11 वा हिंदुस्थानी कर्णधार ठरला असून, एमएस धोनीच्या नावावर सर्वाधिक 4 वेळा अशी नोंद आहे. या सामन्यात ऋषभ पंतने 55 धावा आणि देवदत्त पडिक्कलने 80 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान, पहिल्या डावातील 486 धावा हा वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावरील हिंदुस्थानचा सर्वोच्च कसोटी स्कोर ठरला आहे. याआधी 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध या मैदानावर टीम इंडियाने केलेली 438 धावांची खेळी हा सर्वोच्च विक्रम होता.

Comments are closed.