NZ vs IND 1st Test: तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी केली किवी गोलंदाजांची धुलाई, कॅप्टन गिलची मात्र निराशा!
गुरूवारपासून (१९ नोव्हेंबर) सुरू झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस (शनिवार, २१ नोव्हेंबर) भारताच्या नावावर राहिला. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता ४ विकेट्स गमावून ४८६ धावा केल्या आहेत. भारताकडे आता ११८ धावांची आघाडी आहे.
भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे शतक झळकावले, तर कर्णधार शुभमन गिलचे शतक केवळ २ धावांनी हुकले. तो दिवसाच्या शेवटच्या षटकात जेकब डफीच्या गोलंदाजीवर ९८ धावांवर असताना बाद झाला.
भारताने तिसऱ्या दिवसाची सुरूवात १ बाद १५९ धावसंख्येवरून केली. देवदत्त पडिक्कल आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. पडिक्कल ८० धावा करून बाद झाला, तर राहुलने १३६ धावा केल्या. राहुलचा हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील न्यूझीलंडमधील पहिलाच सामना आहे. शतक पूर्ण करताच त्याने अनेक विक्रम रचले.
न्यूझीलंडमध्ये आपल्या कसोटी पदार्पणात शतकी खेळी करणारा राहुल हा गेल्या ५० वर्षांतील पहिला भारतीय फलंदाज ठरला. खेळपट्टीवर सध्या विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत ५५ धावा करून नाबाद आहे. एकंदर भारताने तिसऱ्या दिवसाच्या सर्व सत्रात वर्चस्व गाजवले.
न्यूझीलंडसाठी डफी सर्वात महागडा गोलंदाज राहिला असला, तरी त्याला कर्णधार टॉम लॅथमने तिसऱ्या दिवसाचे शेवटचे षटक दिले. त्याने १२५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गिलला त्रिफळाचीत केले आणि कसोटीत नर्व्हस ९० मध्ये बाद झालेल्या भारतीय कर्णधारांमध्ये गिलचा समावेश झाला.
कसोटी सामन्यांमध्ये नर्व्हस ९० मध्ये सर्वाधिक बाद होण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. तो चार वेळा कसोटीत नर्व्हस ९० मध्ये बाद झाला, तर गिल पहिल्यांदाच असा बाद झाला आहे.
कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा नर्व्हस ९० मध्ये बाद
४ – एमएस धोनी
२ – सचिन तेंडुलकर
१ – नारी कॉन्ट्रॅक्टर, एमएके पतौडी, अजित वाडेकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली, शुभमन गिल
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने पहिल्या डावात ग्लेन फिलिप्स आणि हेन्री निकल्सच्या शतकी खेळींच्या जोरावर ३६८ धावा केल्या. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२७ चा (WTC27) भाग आहे.
Comments are closed.