पाऊलखुणा – चासकमानची त्रिपुरी पौर्णिमेची उजळण!

<< आशुतोष बापट
[email protected]

त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र शंकराच्या मंदिरामध्ये असलेल्या दीपमाळा दिव्यांनी उजळून निघतात. चासकमानला भीमा नदीच्या काठावरील देखण्या सोमेश्वर मंदिरातील अत्यंत विलोभनीय आणि डौलदार अशी ही दीपमाळही या दिवशी प्रकाशाने उजळून निघते.

तारकासुराचे तीन पुत्र- विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतले होते. त्या वरानुसार त्यांना आपल्या मनाजोगत्या हालचाली करता येतील, तसेच ज्या पुरांचे एक हजार वर्षांनी एकीकरण होईल व जी फक्त एकाच विशिष्ट बाणाने नष्ट होतील अशी तीन पुरे त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांना स्वर्ग, अंतरीक्ष व पृथ्वी यांवर एक सोन्याचे, एक चांदीचे आणि एक लोहाचे अशी तीन पुरे प्राप्त झाली. ते तिघेही त्या पुरांमध्ये राहून देवांना त्रास देऊ लागले. या वरामुळे सर्वत्र हलकल्लोळ माजला. तिन्ही लोकी दहशत निर्माण झाली. शेवटी सर्वांनी देवाधिदेव महादेवाकडे मदतीची याचना केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व देवांची मदत घेतली. महादेव एका रथात आरुढ झाले. चंद्र-सूर्य त्या रथाची चाके झाली. विष्णू हा तो बाण बनला, अग्नी त्या बाणाचे टोक बनला, तर यम बाणाची पिसे. वेद त्याचे धनुष्य बनले आणि सावित्री त्याची प्रत्यंचा बनली. ब्रह्मा शिवाचा सारथी झाला. अशा प्रकारे बनलेल्या तीन टोकांच्या बाणाने शिवाने त्या तीनही असुरांचा त्यांच्या नगरासह वध केला. त्रिपुरासुराचं निर्दालन महादेवानं ज्या दिवशी केले तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा. या दिवशी सर्वत्र शंकराच्या मंदिरामध्ये असलेल्या दीपमाळा दिव्यांनी उजळून निघतात. दुष्ट शक्तींवर, अंधकारावर मिळालेला तो विजय दिवे लावून साजरा केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेला पेटवली जाणारी वात हीसुद्धा त्रिपुरवात म्हणून प्रसिद्ध आहे.

विविध मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा होतोच, परंतु या सर्वात अत्यंत देखणा आणि दिमाखदार असा उत्सव पुणे जिह्यातल्या खेड तालुक्यामधील चासकमान या गावी साजरा केला जातो. पुण्यापासून जेमतेम 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव मुद्दाम भेट देण्याजोगं आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदैवत असलेलं सोमेश्वर महादेवाचं मंदिर. या मंदिराच्या प्रांगणातच एक भव्य दीपमाळ आहे. 256 दिवे असलेली अशी ही डौलदार दीपमाळ त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री अनेक दिव्यांनी उजळते. त्रिपुरीच्या रात्री सोमेश्वरावर रुद्राचा अभिषेक होतो. त्यानंतर गावातली तरुण मंडळी या दीपमाळेच्या प्रत्येक खोबणीमध्ये एकेक पणती लावतात. वरपासून खालीपर्यंत या पणत्या लावत येतात. दीपमाळेच्या सर्वात वरती मोठी खोबण असून त्यात सर्वात मोठी त्रिपुरवात लावली जाते.

मंदिराला विस्तीर्ण प्रांगण आहे आणि सर्व बाजूनं हे मंदिर तटबंदीनं बंदिस्त आहे. या तटबंदीवर चढून जाण्यासाठी जिने केलेले आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये बसायला सलग ओटे आहेत आणि मागील भिंतींमध्ये कोनाडे केलेले आहेत. या प्रत्येक कोनाड्यामध्ये तेलाचे दिवे लावतात. या ओट्यावर सलग ओळीमध्ये दिव्यांची आरास करतात. हे सर्व साग्रसंगीत पार पडल्यावर मंदिर परिसरातील विजेचे सर्व दिवे बंद केले जातात आणि मग सगळा आसमंत त्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अत्यंत भारावलेलं असं वातावरण असतं ते. बराच वेळ हा दीपोत्सव चालू राहतो. आकाशात उगवलेला रजनीनाथ आणि त्याच्याच साक्षीनं इथे धरतीवर होणारा हा दीपोत्सव, हा स्वर्गीय अनुभव प्रत्येकाने किमान एकदा तरी घेतलाच पाहिजे.

चास हे गाव म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सासुरवाडीचं गाव. जोशी घराण्यातील लाडूबाई ऊर्फ ताईबाईसाहेब यांचा विवाह बाळाजी विश्वनाथ भट पेशव्यांचा थोरला मुलगा विश्वासराव ऊर्फ विसाजी ऊर्फ बाजीराव यांच्याशी इ.स. 1711 साली झाला. लाडूबाई मग सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेब झाल्या. 1742 मध्ये त्या काशीयात्रेलासुद्धा जाऊन आल्या. काशीबाईंचे वडील महादजी कृष्ण जोशी हे पेशव्यांचे सावकार होते. काशीबाईंनी आपल्या माहेरी चासकमानला भीमा नदीच्या काठावर उत्तम असा घाट बांधवून घेतला, देखणं सोमेश्वर मंदिर बांधलं. त्या मंदिरात उभारली अत्यंत विलोभनीय आणि डौलदार अशी ही दीपमाळ. गावात आजही चासकर जोश्यांचा वाडा सुस्थितीत उभा आहे. सुरेशकाका जोशी यांनी अनेक जुनी कागदपत्रे, ऐतिहासिक तलवार, पितळी हत्ती, दगडी चौरंग, अंगणातल्या सात तोफा अशा अनेक ऐतिहासिक वस्तू प्रयत्नपूर्वक जतन केलेल्या आहेत. गावात उजव्या सोंडेचा गणपती, पाटणकरांचे लक्ष्मी-विष्णू मंदिर, लघाटे यांचं गणेश मंदिर अशीही इतर मंदिरं आहेत. पण हे सोमेश्वराचं मंदिर, त्याची ती डौलदार दीपमाळ, मंदिराची तटबंदी, त्यातले कोनाडे या सर्व गोष्टी मुद्दाम पाहण्याजोग्या आहेत. त्रिपुरीच्या या दीपोत्सवात स्थानिक सहभागी होतातच, पण मुद्दाम हा उत्सव पाहायला बाहेरगावची हौशी मंडळीदेखील हजेरी लावतात.

यंदा त्रिपुरी पौर्णिमा येत्या मंगळवारी 24 नोव्हेंबरला आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इथल्या सोमेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा होईल. ही दीपमाळ म्हणजे जणू प्रकाशाचं एक झाडच बनेल. पुण्यातून जेवण करून निवांत रात्री 8 च्या सुमारास निघावं. पुणे-राजगुरूनगर-वाडा रस्तामार्गे चासकमानला पोहोचायला दीड तास पुरतो. चढत जाणारी रात्र, काहीशी बोचरी थंडी, कानावर पडणारे रुद्राचे दैवी स्वर आणि समोर लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली दीपमाळ! काही केल्या इथून हलू नये असं वाटतं. मनशांतीसाठी अजून काय हवं. मंदिराच्या तटावर बसून हे दृश्य अजून रमणीय दिसतं. प्रत्येकानं मंदिराचं आणि परिसराचं पावित्र्य मात्र आवर्जून राखावं. त्रिपुरीच्या या रम्य दीपोत्सवाचं साक्षीदार व्हावं.

Comments are closed.