साय-फाय – अंतराळातील शहरे!
<< प्रल्हाद ताम्हणकर
[email protected]
पृथ्वीवर एखादी इमारत उभी करायची असेल तर कामगार, यंत्रसामग्री आणि बांधकामाचे साहित्य लागते, पण अंतराळात? तिथे गुरुत्वाकर्षण अत्यंत कमी, तापमानात प्रचंड चढउतार आणि माणसांसाठी धोकादायक किरणोत्सर्ग असतो. अशा ठिकाणी अंतराळवीरांना पाठवून प्रत्येक भाग जोडणे खर्चिक आणि जोखमीचे आहे. म्हणूनच भविष्यात अंतराळातील मोठी बांधकामे माणसांऐवजी रोबोट करतील, अशी कल्पना आता केवळ विज्ञानकथेत राहिलेली नाही. प्रत्यक्ष प्रयोगांनी तिची सुरुवात दाखवली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच कॅलटेकच्या संशोधकांनी तयार केलेल्या ‘अॅस्ट्रा’ नावाच्या यंत्रमानवाने नुकतेच पृथ्वीभोवतीच्या कक्षेत बांधकामाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. अमेरिकेच्या संरक्षण प्रगत संशोधन प्रकल्प संस्थेच्या (डार्पा) मदतीने झालेल्या या प्रयोगात रोबोटिक हाताने जवळच्या साठवण कप्प्यातून हलक्या नळ्या आणि जोडण्या उचलल्या. त्यांना ठरावीक क्रमाने एकमेकांना जोडून त्याने सांगाड्यासारख्या रचनेचा एक भाग तयार केला. अंतराळवीरांच्या प्रत्यक्ष मदतीशिवाय अंतराळात एखादी रचना स्वयंचलित पद्धतीने उभारण्याची ही पहिली यशस्वी चाचणी असल्याचे कॅलटेकने म्हटले आहे.
या प्रयोगात सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले असे मात्र नाही. ‘अॅस्ट्रा’ यंत्रणेने आधीच तयार केलेले दोन भाग बाहेर काढले आणि स्वत आणखी एक भाग जोडण्यात यश मिळवले. मात्र वेळेच्या मर्यादा आणि अंतराळातील अनपेक्षित अडचणींमुळे संपूर्ण परावर्तक अँटेना तयार करता आला नाही. तरीही अवकाशात रोबोटच्या मदतीने बांधकाम शक्य असल्याचे या चाचणीने दाखवून दिले. पृथ्वीवरून संशोधक सूचना पाठवत होते आणि कॅमेऱ्यांनी मिळालेल्या छायाचित्रांतून कामाची तपासणी करत होते. संपर्कासाठी दररोज मोजक्याच वेळा संधी मिळत असल्याने रोबोटने अनेक कामे स्वतच्या संगणकीय सूचनांनुसार करणे आवश्यक होते.
याचा पुढचा टप्पा अधिक मोठा असू शकतो. आज मोठे उपग्रह, दुर्बिणी किंवा सौरऊर्जा गोळा करणाऱया रचना अंतराळात पाठवताना रॉकेटच्या आकाराची मर्यादा येते. त्यामुळे काही भाग दुमडून पाठवावे लागतात किंवा अनेक उड्डाणांतून वेगवेगळे भाग नेऊन अंतराळवीरांकडून जोडावे लागतात, पण भविष्यात साहित्य वेगवेगळे पाठवून रोबोटच्या मदतीने तिथेच मोठ्या रचना उभारता येऊ शकतील. नासाचा ‘आर्माडास’ प्रकल्पही लहान रोबोट एकत्र काम करून निवासस्थाने, मोठे अँटेना आणि चंद्रावरील उपयोगी रचना तयार करू शकतील अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे.
कल्पना करा, चंद्रावर माणसे पोहोचण्यापूर्वीच रोबोट तिथे उतरले आहेत. ते जमिनीची पाहणी करतात, उपलब्ध साहित्य वापरतात, निवासासाठी सुरक्षित जागा तयार करतात आणि सौरऊर्जेचे पॅनेल बसवतात. मंगळावरही अशा यंत्रांच्या मदतीने भविष्यातील मोहिमांसाठी प्राथमिक तळ उभारता येऊ शकतो. मात्र धूळ, किरणोत्सर्ग, अत्यंत थंडी-उष्णता, यंत्रातील बिघाड आणि मर्यादित ऊर्जा ही मोठी आव्हाने असतील. पृथ्वीवरून प्रत्येक हालचाल नियंत्रित करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे रोबोटना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता द्यावी लागेल.
अशा बांधकामासाठी पृथ्वीवरून तयार इमारती किंवा मोठे भाग पाठवण्याऐवजी स्थानिक साधनसामग्रीचा वापर करण्याचाही विचार सुरू आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीसारख्या पदार्थांपासून विटा, संरक्षण भिंती किंवा बांधकामासाठी लागणारे घटक तयार करता आले, तर मोहिमांचा खर्च कमी होऊ शकतो. काही प्रयोगांमध्ये चंद्राच्या मातीसारख्या कृत्रिम पदार्थांवर छपाई आणि आकार देण्याच्या पद्धती तपासल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्ष चंद्रावरील धूळ, कमी
गुरुत्वाकर्षण आणि तापमान यांत ही तंत्रे किती टिकतील, हे अजून सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे भविष्यातील अंतराळ बांधकामात रोबोट, स्वयंचलित यंत्रे आणि स्थानिक साधनसामग्री यांची सांगड महत्त्वाची ठरणार आहे. यंत्रांना सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी आधीच डिजिटल आराखडे तयार केले जातील आणि प्रत्येक जोडणीची तपासणी सेन्सर करतील. एखादा भाग चुकीचा बसला, तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही रोबोटवरच असेल.
आजची चाचणी म्हणजे अंतराळात शहर उभे राहिले, असा अर्थ नाही. पण माणसांशिवाय बांधकाम करणाऱ्या यंत्रांची पहिली पायरी नक्कीच आहे. उद्या चंद्रावर किंवा मंगळावर मानवी वस्ती उभारली गेली, तर तिचे पहिले बांधकाम करणारे कामगार माणसे नसून रोबोट असतील का आणि अशा शहरात माणूस पोहोचेल तेव्हा त्याला स्वागत करायला एखादा यंत्रमानव आधीपासून उभा असेल
च्या?
Comments are closed.