स्त्री-लिपी – समंजसतेचा बहुमुखी प्रत्यय!
<< डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
vandanabk63@gmail.com
आधुनिक मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री आणि संशोधिका डॉ. अरुणा ढेरे. मानवी मूल्ये, भारतीय संस्कृती, स्त्रीवाद आणि लोकसाहित्य या घटकांचे दर्शन घडवणारे त्यांचे साहित्य स्त्रीसंवेदनांचा समंजस प्रत्यय देते.
गंगाधर गाडगीळांनी म्हटलं आहे, ‘प्रत्येक लेखकाचं एक नंदनवन असतं. त्याच्या निर्मितीचा जणू गाभा.’ अरुणा ढेरे या कवयित्रीचं नंदनवन आकाराला आला ते शनिवारपेठेतल्या नदीकाठच्या वाड्यात. सारवलेल्या अंगणात. माणसांच्या मेळाव्यात. लिहित्या वडिलांच्या सान्निध्यात. माणूस महत्त्वाचा मानण्याच्या मोलाच्या संस्कारात.
अरुणा ढेरे यांच्या बहुमुखी प्रतिभेला, वाङ्मयीन ऊर्जेला तीन वाटा आहेत. एका वाटेने कविता आणि ललित गद्य असं आत्मनिष्ठ लेखन बहरलं. दुसरी वाट वास्तव आणि कल्पना यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या कथा – कादंबऱ्यांची. आणि संशोधन – समीक्षा – संपादनं यांच्या संपादित पुस्तकांची तिसरी वाट.
‘प्रारंभ’, ‘यक्षरात्र’, ‘मंत्राक्षर’ असे कवितासंग्रह, ‘उंच वाढलेल्या गवताखाली’, ‘कृष्णकिनारा’, ‘मन केले ग्वाही’ असे कथासंग्रह, ‘उर्वशी’, ‘मैत्रेयी’, ‘महाद्वार’ अशा कादंबऱ्या, ‘लावण्ययात्रा’, ‘रूपोत्सव’ असं ललितगद्य, ‘मामाचं घर’, ‘सुंदर जग हे’ असे बालकवितासंग्रह, ‘विस्मृतिचित्रे’ , ‘त्यांची झेप त्यांचं अवकाश’ असं संशोधनपर लेखन, ‘काळोख आणि पाणी’सारखं समीक्षा लेखन, अनेक संपादने, अनेक अनुवाद ! विविध प्रकारांतली 50 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. शिवाय विविध कार्यक्रमांच्या संहिता त्यांनी लिहून सादर केल्या आहेत. महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. असंख्य चर्चासत्रांत निबंध वाचन केलं आहे.
त्यांच्या साहित्यातील स्त्री संवेदन महत्त्वाचं आहे. स्वर्गीय उर्वशी असो की तपस्विनी मैत्रेयी असो, रुक्मिणी असो की द्रौपदी की सीता. रुक्मिणीदेवी अरुंडेल असो की रुकय्या हुसेन. विविध काळातल्या स्त्रीचं जगणं त्या आत्मीयतेनं मांडत आल्या आहेत. या स्त्रियांचं ‘मन’ वाचण्याची किमया त्यांना साधलीय. बाईची घुसमट, तिचं बळ, तिची सर्जनाची ताकद, तिची समजूत यांचे अनेक रंग त्यांनी दाखवलेत. झणझणून दुखणारं तिचं मन त्यांना समजलंय. बाईची प्रेम करण्याची आणि ते जपण्याची क्षमता त्यांनी मोठय़ा समरसतेनं पुढे ठेवलीय.
एकीकडे संस्कृतीच्या व्यापक पटावर त्यांनी बाईचं जगणं समजून घेतलं आणि ते संशोधन आणि गद्य लेखनातून मांडलं तर दुसरीकडे व्यक्तिगत पातळीवर भिडलेलं तिचं जगणं त्यांच्या कवितांमधून उमटलं आहे. त्यांची स्त्रीविषयक जाणीव समजुतीच्या पातळीवरची अधिक आहे. ती संघर्षशील नाही किंवा लढाऊ नाही. ऊरबडवा आक्रोश त्यात नाही. ती अंतर्मुख करणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे.
अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा असे दोन प्रवाह आपल्याकडे सर्वच कलांच्या क्षेत्रात दिसतात. संगीत असो की नृत्य, नाट्यकला असो की साहित्य, या दोन्ही प्रवाहांमधून कलेचा विकास होत गेलेला आढळतो. त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा या दोन्ही तीरांना सतत स्पर्शत राहिल्या. दोन्ही काठांवर त्या सहजभावानं ये – जा करीत राहिल्या. अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा यांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. या दोन्ही परंपरांच्या सम्यक भानामुळे त्यांच्या साहित्यामधून सातत्यानं समजुतीचा, समन्वयाचा सूर जाणवत राहतो.
कोणत्याही कलावंतासाठी सर्वात मोठं श्रेयस म्हणजे त्यानं स्वतला स्वत निवडलेल्या माध्यमात पूर्ण उतरवणं. अरुणाताई हे सतत, जागत्या भानानिशी करत आल्यायत. आधुनिक दृष्टिकोनातून आपल्या साहित्य संचिताचा नवा अर्थ लावणं, नव्या बाजू प्रकाशमान करणं हा त्यांच्या सर्वच लेखनाचा गाभा आहे.
वर्तमान वास्तवाचं दर्शन घडवताना त्यांनी नेहमीच कलावंताच्या ‘बांधील’ असण्याला व्यापक आणि उदात्त संदर्भ दिलाय. समकालीन वास्तवाचा वेध घेताना क्वचित त्यांचा सूर उपरोधपूर्ण आणि तीव्र लागतो, पण ती संस्कृती ऱ्हासाची वेदना असते. अस्मितांचे तळ शोधताना होणाऱ्या माणुसकीशून्य वर्तनाची कळ असते. त्यांच्या साहित्यिक योगदानाची यथोचित दखल विविध सन्मान आणि पुरस्कारांनी घेतली गेली आहे. पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
यवतमाळ इथे साजऱ्या झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वडील डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ज्ञानाचा वारसा स्वतची भर घालून त्यांनी स्वतःच्या वाटेनं पुढे नेला आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या नावानं संस्कृती संशोधन केंद्र उभारून त्यांच्या ज्ञानपरंपरेचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम करण्यात सध्या त्या गुंतून गेल्या आहेत.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
Comments are closed.