शिवगर्जना! शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची जय्यत तयारी! साऱ्या देशाचे लक्ष!! उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

महाराष्ट्राची तब्बल सहा दशकांची  वैभवशाली परंपरा… ‘एकच पक्ष, एकच मैदान आणि एकच नेता’ असा ऐतिहासिक वारसा असलेला शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी दादर येथील शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात, महाराष्ट्र हितासाठी कोणती शिवगर्जना करतात याकडे साऱया देशाचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जय्यत तयारी केली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून राजकीय विचारांची दिशा दिली. हिंदूंमध्ये प्रखर राष्ट्रवादाचा वन्ही चेतवला. मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवले. मराठी माणसाला आत्मसन्मानाने आणि ताठ मानेने जगण्याचे बळ दिले. शिवसेनाप्रमुखांचा हाच वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच जोमाने पुढे नेत आहेत. त्यामुळे मराठी माणूसच नाही तर अवघ्या देशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्पंठा असते. यातच देशात सध्या मतचोरी, भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रण पेटले आहे. महाराष्ट्रावर दुष्काळ ओढवला आहे. असे असताना राज्यकर्ते आपल्याच मस्तीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे कोणती शिवगर्जना करणार याची उत्पंठा शिगेला पोहोचली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी-पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिह्यांचे जिल्हाप्रमुख, संपर्पप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला जिल्हा संघटकांसह  महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनताही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

मेळाव्याचा टिझर तुफान गाजतोय!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओंना सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘हिंदुस्थानमध्ये आम्ही हिंदू आहोत, महाराष्ट्रात मराठी आहोत’ असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठणकावून सांगत आहेत. मेळाव्यासाठी येणारे शिवसैनिकांचे तुफान डोळे दिपवणारे दिसत आहे. ‘मनामध्ये माज, तरी आपण मुजोर नाही. दिसतो साधेभोळे, तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला नडायचा पुणामध्ये जोर नाही. आपल्या एवढी पुणाचीही निष्ठा कठोर नाही. महाराष्ट्र वाचवण्या, मतभेद दूर टाकरे… पक्ष आपुला ठाकरे. मराठीच्या रक्षणासाठी भाऊ आता एक जाहले… रक्त आपले ठाकरे. आन बान शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे, रक्त आपुले ठाकरे’ असे गीत या व्हिडीओत आहे.

शस्त्रपूजा, सोनेवाटप, रावणदहन…

शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदू संस्पृती-परंपरेचे दर्शन घडवणारा ठरतो. मेळाव्यासाठी अनेक शिवसैनिक भगवा झेंडा डौलाने फडकवत मोठय़ा जल्लोषात शिवतीर्थावर येत असतात. मेळाव्यानिमित्ताने शिवतीर्थावर शस्त्रपूजा, सोनेवाटप, रावणदहनही केले जाणार आहे.

संविधान रक्षणासाठी, मशाल महाराष्ट्रासाठी

‘संविधानाच्या रक्षणासाठी, ‘मशाल’ महाराष्ट्रासाठी’, ‘दसरा मेळावा… इथूनच नवा विचार मिळतो महाराष्ट्राला… अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, सज्ज होऊया पुन्हा संविधान रक्षणासाठी! भेटूया 20 ऑक्टोबरला!’ अशी ‘एक्स’ पोस्ट शिवसेनेने केली आहे.

स्थळ    शिवतीर्थ, दादर

वेळ      सायं. 5 वाजता

Comments are closed.