होय, आम्ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
‘निवडणुकीच्या माध्यमातून मते व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेतला जात असेल, आंदोलनाचा आमचा अधिकार काढून घेतला जात असेल तर अशी राजवट गाडूनच टाकली पाहिजे असे ठणकावतानाच, होय, आम्ही ही सत्ता उलथवून टाकण्यासाठीच उभे आहोत. काय बोलायचे ते बोला,’ असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. आंदोलनातील पोलिसी अत्याचारावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘प्रश्न विचारणाऱया प्रत्येकाला देशद्रोही ठरवता, रिजीम चेंज करण्याचा कट आहे असे म्हणता, मग दिल्लीत हजारो पोलीस नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला आणून ठेवले आहेत का? हे पोलीस मुलांची डोकी फोडताहेत. महिलांना-मुलींना फरफटत नेताहेत. वाटेल तसे मारताहेत. केस ओढताहेत, कपडे फाडताहेत. हा काय तुमचा दांडिया चालला आहे का’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला.
‘गोवर्धन उचलण्यासाठी सर्वांचा हातभार लागला होता, तसा तुमचा सर्वांचा हातभार लागला तर लोकशाहीचा गोवर्धन पुरातून वरती लोटू शपू. नाही तर आपण सर्व बुडालो म्हणून समजा,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सर्व पत्रकारांना सावध केले.
ज्याने राम आणला तो झुरळाला घाबरतोय!
‘दसऱ्याला रावण दहनाची परंपरा आहे. आम्ही अनेक वर्षे ती पाळत आहोत. यावेळी दिल्लीत रावणासोबत 30 फुटी काॅक्रोच जाळणार असल्याचे ऐकले आहे. त्यावरून कोणीतरी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. तू सुद्धा पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केले होतेस की काय, असं रावण झुरळाला विचारताना त्या व्यंगचित्रात दिसतो. सध्याच्या परिस्थितीवरचं हे मार्मिक भाष्य आहे. ज्याने राम आणला तो झुरळाला घाबरतोय अशी परिस्थिती आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणला.
Comments are closed.