अक्षर पटेलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह! दिल्लीला नव्या कॅप्टनची गरज, केएल राहुल ठरणार का तारणहार?

पहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी अजूनही प्रतीक्षा करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून दिल्ली जवळपास बाहेर पडली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.

दिल्लीला अजून 3 सामने खेळायचे आहेत. संघाने हे तिन्ही सामने जिंकले तरी त्यांचे जास्तीत जास्त 14 गुण होतील. मात्र यंदाच्या हंगामात 14 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरणे कठीण मानले जात आहे. दिल्लीच्या या खराब कामगिरीनंतर कर्णधार अक्षर पटेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

सर्वप्रथम अक्षर पटेल याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, तो एक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र आयपीएल 2026 मध्ये त्याने 11 सामन्यांत केवळ 10 विकेट्स घेतल्या आहेत. अनेक वेळा त्याने आपल्या चार षटकांचा कोटाही पूर्ण केला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये अक्षर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत फलंदाजांवर दबाव निर्माण करतो, पण या हंगामात त्याची ती धार दिसून आली नाही. गोलंदाजीत तो कमकुवत वाटला.

फलंदाजीमध्येही त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली. 11 सामन्यांत अक्षर पटेलला 50 धावांचाही टप्पा गाठता आला नाही. त्याने या हंगामात अवघ्या 6.29 च्या सरासरीने 44 धावा केल्या आहेत. कर्णधाराकडून अशी कामगिरी होत असेल तर त्याचा परिणाम इतर खेळाडूंवरही होऊ शकतो.

कर्णधारपदातही अक्षर पटेल अपयशी ठरल्याचे दिसले. अनेकदा त्याने फलंदाजांचा योग्य वापर केला नाही. आशुतोष शर्मा आणि डेव्हिड मिलर अनेक सामन्यांत फलंदाजीची वाट पाहतच राहिले. केकेआर विरुद्धच्या सामन्यात तर अक्षर पटेलने डेव्हिड मिलरसारख्या अनुभवी फिनिशरलाच संघाबाहेर ठेवले. क्षेत्ररक्षणातही त्याने काही साधे निर्णय घेतल्याचे दिसून आले.

असे दिसत आहे की अक्षर पटेलला कर्णधारपदाचा दबाव सांभाळणे कठीण जात आहे. त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवरही होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स नव्या कर्णधाराच्या शोधात जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

या शर्यतीत सर्वात मजबूत पर्याय म्हणून केएल राहुल याचे नाव समोर येत आहे. राहुलने यापूर्वी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायट्ंस या संघांचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्येही प्रवेश केला होता.

टॉप ऑर्डरमध्ये खेळताना राहुलचा खेळ अधिक प्रभावी झाला आहे. त्यांचा स्ट्राइक रेटही आता चांगला राहू लागला आहे. त्यामुळे पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स राहुल याच्याकडे कर्णधारपद सोपवणार का, आणि राहुल दिल्लीला पहिले विजेतेपद मिळवून देऊ शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.