ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात व्हिडीओ; कुस्तीपटू विनेश फोगाटवर शिस्तभंगाची कारवाई आणि बंदी
हिंदुस्थानी कुस्ती महासंघाने (WFI) स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला शिस्तभंग आणि अमली पदार्थ प्रतिबंधक (अँटी-डोपिंग) नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे विनेशला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत विनेश फोगाटने हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये आपलाही समावेश असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, WFI च्या मते, जागतिक कुस्ती संघटनेच्या (UWW) नियमांनुसार, निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात परतणाऱ्या खेळाडूला सहा महिने आधी तशी नोटीस देणे अनिवार्य असते, जेणेकरून त्या काळात त्यांची चाचणी घेता येईल. विनेशने या सहा महिन्यांच्या अनिवार्य कालावधीचे पालन केले नसल्याचा दावा महासंघाने केला आहे. विनेशने डिसेंबर 2024 मध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते आणि त्यानंतर 2025 च्या शेवटी पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र कायदेशीर प्रक्रियेतील त्रुटींमुळे तिला सध्या अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विनेश फोगाटला आता 10 ते 12 मे दरम्यान उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱ्या ‘नॅशनल ओपन रँकिंग’ स्पर्धेतही खेळता येणार नाही.
यशस्वी जैस्वालसह वर्ल्ड कप विजेत्या शफाली वर्माच्या अडचणी वाढणार? नाडाने नोटीस पाठवली
महासंघाने विनेशवर ‘Whereabouts Failure’ नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि चाचणीला मुकल्याचा (मिस्ड टेस्ट) गंभीर आरोप केला आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी उत्तेजक नियंत्रण अधिकारी विनेशला चाचणीसाठी शोधू शकले नाहीत, ज्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेने (ITA) केली आहे. याशिवाय, विनेशच्या वागण्यामुळे हिंदुस्थानी कुस्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचे सांगत, महासंघाने तिच्याकडून या सर्व प्रकरणांवर स्पष्टीकरण मागितले आहे.
Comments are closed.