Ram Mandir Donation | राम मंदिर उत्पन्न माहिती प्रतिमाह देणार, न्यासाच्या वेबसाईटवर आकडेवारी उपलब्ध होणार

► वृत्तसंस्था अयोध्या
अयोध्येतील रामजन्मभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या राम मंदिराच्या उत्पन्नाची माहिती प्रत्येक महिन्याला राम मंदीर न्यासाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल, अशी घोषणा ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’ने केली आहे.

मंदिराला भक्तांकडून देण्यात आलेल्या दानाच्या रकमेतील काही धनाचा अपहार करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घेण्यात येणार आहे, म्हणून दानाच्या व्यवस्थापनाची पद्धती सुधारण्यात येत आहे.

केवळ भारतीय चलनातील नव्हे, तर विदेशी चलनांमध्ये राम मंदिराला मिळणाऱ्या धनाचा आणि देणग्यांचाही खातेनिहाय हिशेब यापुढे प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भक्तांच्या आणि सर्वसामान्य हिंदूंच्या मनात मंदिराच्या अर्थकारणाच्या संदर्भात कोणताही संशय निर्माण होऊ नये, अशा पारदर्शक पद्धतीने सर्व हिशेब ठेवले जातील आणि प्रसिद्ध केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण न्यायासाच्या रचना परिवर्तनाची प्रक्रिया हाती घेण्यात येत आहे.

रचनात्मक परिवर्तन त्वरित होणार
‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’च्या रचनेत अमूलाग्र परिवर्तन केले जाणार असून ती प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे. न्यासाच्या महासचिवपदी डॉ. कृष्णमोहन यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 22 जुलैला आपला पदभार हाती घेणार आहेत. 6 जुलैला पार पडलेल्या न्यासाच्या बैठकीत त्यांची नियुक्ती अंतरिम महासचिव म्हणून करण्यात आली आहे.

न्यासाच्या सदस्यत्वाची तीन पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येणार आहेत. अयोध्येच्या राजघराण्याचे वंशज यतींद्र मोहन मिश्रा यांचा समावेश न्यासाचे सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे. अन्य दोन रिक्त पदांवरही मान्यवर व्यक्तींची निवड केली जाणार असून त्यांची नावे निवडली गेली आहेत. औपचारीक घोषणा लवकरच केली जाणार आहे.

अपहार प्रकरण काय आहे…
राम मंदिराच्या दानपेट्यांमध्ये भक्तांनी अर्पित केलेल्या धनापैकी काही धनाचा अपहार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला आहे. मंदिराच्या न्यासाने असा अपहार झाला असल्याचे मान्य केले असून स्वत: उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार सादर केली आहे.

ही तक्रार सादर करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली केली आहे. या दलाने आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे.

दानाची गणना करणारे कर्मचारी आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. न्यासाचे माजी महासचिव चंपत राय आणि आणखी एक सदस्य अनूप मिश्रा यांनी आपल्या पदांचा त्याग केला आहे.

Comments are closed.