रोहित शर्माच्या प्रसिद्ध ट्रॉफी सेलिब्रेशनची कॉपी करण्याचा बाबरचा प्रयत्न फसला, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तान सुपर लीग २०२६ चा अंतिम सामना रविवारी (३ मे) खेळला गेला. हा हंगाम बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीने जिंकला. कर्णधार म्हणून बाबरचे हे पहिले, पेशावरचे दुसरे आणि त्याचे कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात पेशावरने हैद्राबाद किंग्जमेनला ५ विकेट्स राखून पराभूत केले. जेव्हा बाबर मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्विकारण्यासाठी मंचावर गेला, तेव्हा त्याने रोहित शर्माच्या प्रसिद्ध सेलिब्रेशनची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. संघातील वरिष्ठ खेळाडू इफ्तिखार अहमदनेही तसाच प्रयत्न केला, मात्र दोघेही पूर्णपणे अपयशी ठरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी घेण्यासाठी ज्याप्रकारे स्टेजवर एंट्री केली होती, अगदी तसेच बाबरने केले आहे. या व्हिडिओमध्ये तो ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर चढताना लहान मुलासारखा धावताना दिसत आहे. त्याच्याबरोबरच इफ्तिखारनेही रोहितच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला असून दोघेही यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
सामन्याबाबत पाहिले तर, प्रथम फलंदाजी करताना हैद्राबाद १२९ धावसंख्येवर सर्वबाद झाला. त्यांना संपूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. पेशावरने हे लक्ष्य १५.२ षटकात ५ विकेट्स राखत गाठले. त्यांच्या या विजयाचा नायक ठरला ऍरॉन हार्डी. त्याने अष्टपैलू खेळी केली. प्रथम त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात २७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. नंतर फलंदाजी करताना ३९ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५६ धावा केल्या.
या सामन्यात बाबर पहिल्याच चेंडूवर विकेट गमावून बसला. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ११ सामन्यांमध्ये १४५.९० च्या स्ट्राईक रेटने तीन अर्धशतके आणि दोन शतकांसह ५८८ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ७३.५० एवढी प्रभावी राहिली.
Comments are closed.