बदलापुरात शहराबाहेरचे 17 हजार मतदार; शिंदेंचे शिवसेना शहरप्रमुख म्हणाले बोगस लोकांना चोप देऊ


ठाणे : राज्यात मतदार यादीतील घोळावरुन राजकारण तापलं असून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगावर होत असलेल्या विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारी पक्षातील नेते उत्तर देत आहेत. मात्र, आता बदलापूर (badlapur) येथील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनीही बदलापुरात 17 हजार मतदार बाहेरचे असल्याचा आरोप केला आहे. बदलापुरात सध्या भाजप नेते किसन कथोरे हे आमदार आहेत.  त्यामुळे, आता भाजप नेते या आरोपावर नेमकं काय बोलतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. तर, बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल 17 हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली आहे.

बाहेरुन आलेल्या या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केलीय. त्यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलु, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली. तसेच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशाराही वामन म्हात्रे यांनी दिला आहे. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असंही म्हात्रे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, राज्यातील विविध मतदारसंघात आता बोगस मतदानाची नावे समोर येत असून निवडणूक आयोगापुढे मतदार याद्यातील घोळ मिटविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा

ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

आणखी वाचा

Comments are closed.