बांगलादेशात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; काय आहे कारण?
बांगलादेशातील राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड समोर आली आहे. देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्पीकर हाफिज उद्दीन अहमद यांनी स्वीकारला आहे. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत बांगलादेशच्या संविधानानुसार आता स्पीकर हाफिज उद्दीन अहमद हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा
आपल्या राजीनाम्याचे कारण सांगताना मोहम्मद शहाबुद्दीन म्हणाले की, ते अत्यंत आजारी असून अनेक शारीरिक आजारांमुळे या महत्त्वाच्या घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळणे त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अशक्य होत होते.
बांगलादेशी वृत्तसंस्था प्रथम आलोनुसार, संविधानाच्या कलम ५०(३) अन्वये राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले राजीनामा पत्र स्पीकरकडे सादर केले आहे. कलम ५४ नुसार, राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास किंवा आजारपणामुळे राष्ट्रपती आपले काम पाहू शकत नसल्यास नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत स्पीकरच राष्ट्रपतींचे कामकाज पाहतात.
तसेच कलम १२३(२) नुसार, राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढील ९० दिवसांच्या आत नव्या राष्ट्रपतींची निवड करणे बंधनकारक आहे. राष्ट्रपतींची निवड संसदेतील सदस्यांच्या मतदानाद्वारे केली जाते.
Comments are closed.