तृणमूल काँग्रेसची बँक खाती गोठवली प्रतिक्रिया पाठवा

ईडीच्या कारवाईने ममता बॅनर्जी यांना 440 कोटी रुपयांचा फटका : विमान खरेदी आणि पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचे आरोप

वृत्तसंस्था/ कोलकाता

ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तृणमूल काँग्रेसच्या 440.42 कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या आहेत. ही रक्कम पक्षाच्या तीन खासगी बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसात करण्यात आलेल्या या कारवाईनंतर सायंकाळपर्यंत याप्रकरणी टीएमसीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नव्हती.

ईडीने मंगळवारी कोलकातामधील पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली. यामध्ये केअरवेल ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांची विमान चार्टर सेवा ऑपरेटर, केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या जागांचा समावेश होता. या छाप्याशी संबंधित प्राथमिक तपासात अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान टीएमसीच्या खात्यांमधून केअरवेल एव्हिएशन आणि एका संबंधित कंपनीकडे अंदाजे 160 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. संबंधित कंपनीने 2023 ते 2026 दरम्यान एका नवीन कंपनीकडे 82.96 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा दावाही तपासात करण्यात आला आहे  ईडीच्या मते, या रकमेपैकी 112 कोटी रुपये एम्ब्रेअर लेगसी 600 बिझनेस जेट आणि ऑगस्टा वेस्टलँड 109एसपी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले. या दोन्ही विमान सेवा नंतर टीएमसीला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या, असे तपास एजन्सीचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांनी या तीन बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर बंदी घातली होती. या तक्रारीत पक्षाच्या निधीच्या स्त्रोताची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पक्षाच्या निधीवरील नियंत्रणावरून टीएमसीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाला आहे. 2 जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना संबंधित खासगी बँकांना या खात्यांमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.

Comments are closed.