बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा संप स्थगित; बँक ग्राहकांना दिलासा – TMarathiNews
नवी दिल्ली : सरकारी बँक कर्मचारी संघटनांनी 28 सप्टेंबरपासून नियोजित केलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून सरकारी बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
27 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेदरम्यान दर महिन्याला आणखी दोन शनिवार सुट्टी देण्याच्या मागणीवर काही प्रमाणात सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या मागणीवर पुढील विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन आयबीएकडून देण्यात आल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी देशातील सरकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. मात्र, आयबीएसोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप पुढे ढकलण्यात आला आहे.
त्यामुळे सोमवारपासून बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, ग्राहकांना नियोजित संपामुळे होणारा व्यत्यय सध्या टळला आहे.
Comments are closed.