बारामतीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यावर ठाम, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला डिवचल
Baramati By Election: राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. राहुरी मतदारसंघासाठी भाजपाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे, तर बारामतीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati By Election) बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावरून भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
अशोक चव्हाण म्हणाले की, बारामती हा शरद पवार आणि अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कायम त्यांच्या पाठीशी राहणारा आहे. अजित दादांच्या अपघाती निधनानंतर स्वाभाविकपणे त्यांच्या कुटुंबातील कोणाला तिकीट मिळावी ही इच्छा होती. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे की, एखादा व्यक्ती गेल्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला सहानभूती दाखवत निवडून दिलं जातं. हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध झाली तर एक वेगळा मेसेज जाईल, असे त्यांनी म्हटले.
Ashok Chavan on Baramati By Election: निवडणूक लढवली तरी केवळ नाममात्र लढत होईल
बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देण्यावर ठाम आहे. याबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची जी अवस्था आहे ती माझ्यापेक्षा लोकांना चांगली माहिती आहे. बारामतीमधील परिस्थिती बघता काँग्रेसचे तिथे अस्तित्वच नव्हतं. निवडणूक लढवली तरी केवळ नाममात्र लढत होईल. फार काही उपयोग नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Ashon Chavan on Nanded Gangwar : अशोक चव्हाण यांचे नांदेड गँगवॉरवर भाष्य
दरम्यान, नांदेडमधील गँगवॉरबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेडमध्ये काल जी मारहाण झाली, त्यात 3 लोकांचा मृत्यू झाला. दोन्ही बाजूकडे गुन्हेगार वृत्तीचे लोकं होते. पण हे असं होता कामा नये. लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. पोलीस प्रशासन त्यांच्यापद्धतीने समज देऊन कामं करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.