पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नसेल तर बारामतीत आमच्याकडे अनेक पर्याय, काँग्रेसची भूमिका
रायगड : बारामती पोटनिवडणूक जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार नसेल तर त्यांनी तसं सांगावं, आमच्याकडे पर्याय आहेत असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असंही ते म्हणाले. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. ते जर लढत नसतील तर आमच्याकडे अनेक पर्याय असतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मागील दोन्ही निवडणुका तुतारी चिन्हावर लढवण्यात आली होती. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी. अंतिम निर्णय हा महाविकास आघाडी घेईल असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. या आधी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. बारामतीची निवडणूक जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार नसेल तर काँग्रेस लढवेल असं वडेट्टीवार म्हणाले.
..तर बारामतीमध्ये तिहेरी लढत
बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हं आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.
सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्यावं – लक्ष्मण हाके
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे वेळापत्रक : बारामती विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम
- निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
- अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
- अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
- मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
- मतमोजणी : 4 मे 2026
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.