IPL 2026: अर्शदीप सिंगवर बीसीसीआयची अचानक बंदी? आयपीएल 2026 दरम्यान कडक कारवाईने क्रिकेट विश्वात खळबळ

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा व्लॉग बनवताना दिसतो. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कडक भूमिका घेत खेळाडूंच्या व्लॉगिंगवर बंदी घातली आहे. 7 खेळाडूंच्या वर्तणुकीवर आक्षेप घेत बीसीसीआयने ही नवीन नियमावली जारी केली असून, त्यानंतर अर्शदीपला आयपीएल दरम्यान व्हिडिओ बनवण्यापासून रोखण्यात आले आहे. या प्रकरणाचा संबंध युझवेंद्र चहलशी संबंधित आहे. अर्शदीप सिंग आपल्या यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत असे. त्याच्या काही व्हिडिओंमुळे मोठे वाद निर्माण झाले.

विमानाने प्रवास करताना युझवेंद्र चहल ई-सिगरेट (Vape) ओढत असल्याचा दावा एका व्हिडिओवरून करण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर अर्शदीपने तो भाग व्हिडिओतून एडिट करून हटवला होता. याआधी एका व्हिडिओमध्ये इतर खेळाडू शशांक सिंगने पकडलेल्या झेलची मस्करी करताना दिसले होते. या घटनांमुळे खेळाडू नको त्या कारणांसाठी चर्चेत येत होते. याची गंभीर दखल घेत बीसीसीआयने अर्शदीपला आयपीएल 2026 संपेपर्यंत एकही व्लॉग न बनवण्याचे आणि संघाशी संबंधित कोणतीही माहिती सोशल मीडियावर न टाकण्याचे आदेश दिले आहेत. याआधी रियान पराग (ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग) आणि राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर (डगआउटमध्ये मोबाईल वापरणे) हे देखील वादात अडकले आहेत.

बीसीसीआयने हॉटेल आणि बसमध्ये अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशाबाबतही अत्यंत कडक पवित्रा घेतला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, काही खेळाडू टीम मॅनेजरच्या परवानगीशिवाय आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेल रूममध्ये प्रवेश देत होते आणि त्या टीम बसमधूनही प्रवास करत होत्या. या बातम्या समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या ‘अँटी-करप्शन युनिट’ने (ACU) कडक पावले उचलली असून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी हॉटेल, ड्रेसिंग रूम किंवा प्रवासाशी संबंधित कोणतीही माहिती सार्वजनिक करू नये.

Comments are closed.