IPL 2026: आयपीएलच्या नियमांमध्ये अचानक बदल! बीसीसीआयच्या नव्या निर्णयामुळे संघांमध्ये खळबळ
आयपीएल 2026 मधील 50 सामने पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि आयपीएलची प्रतिमा जपण्यासाठी अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. आयपीएलचा अर्ध्याहून अधिक प्रवास संपलेला असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व 10 संघांना कठोर निर्देश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनी या नव्या नियमांची माहिती दिली.
बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना इशारा दिला आहे की, खेळाच्या ग्लॅमरस दुनियेत खेळाडूंना ‘हनी-ट्रॅपिंग’ किंवा जाणीवपूर्वक यौन शोषणाच्या जाळ्यात ओढण्याचे मोठे धोके असतात. अशा घटनांमुळे खेळाडूंवर गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे खेळाडूंनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
आता हॉटेलच्या खोल्यांमध्ये खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफला कोणालाही भेटता येणार नाही. कोणताही व्यक्ती खेळाडूचा कितीही जवळचा नातेवाईक किंवा ओळखीचा असला, तरी टीम मॅनेजरच्या लेखी परवानगीशिवाय तो खेळाडूच्या रूममध्ये जाऊ शकणार नाही. पाहुण्यांना भेटण्यासाठी हॉटेलची लॉबी किंवा रिसेप्शन लाउंज यांसारख्या सार्वजनिक जागांचाच वापर करावा लागेल. सामन्यादरम्यान फ्रँचायझी मालक किंवा त्यांच्या प्रतिनिधींना डगआउट, ड्रेसिंग रूम किंवा मैदानावर खेळाडूंशी थेट संवाद साधता येणार नाही.
काही खेळाडू किंवा कर्मचारी ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (Vapes) वापरत असल्याचे बीसीसीआयच्या निदर्शनास आले आहे. भारतीय कायद्यानुसार हे प्रतिबंधित असून त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गवर्निंग कौन्सिलने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याकडे गंभीर शिस्तभंग म्हणून पाहिले जाईल आणि संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
Comments are closed.