टीम इंडियाला मिळणार नवा टी-20 कर्णधार? सूर्यकुमार यादवच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
बीसीसीआय आपल्या टी-20 संघासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. निवड समिती सध्या विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या भविष्याबाबत विचारमंथन करत आहे. तर श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांची नावे संभाव्य पर्याय म्हणून समोर येत आहेत.
19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 30 संभाव्य खेळाडूंच्या यादीतून सूर्यकुमार यादवचे नाव वगळण्यात आल्यानंतर, त्याच्या कर्णधारपदाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. याच कालावधीत भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका नियोजित असली, तरी बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेचा वापर नवीन कर्णधाराची चाचणी घेण्यासाठी एक संधी म्हणून करू शकते, असे अहवालांतून सुचवले जात आहे.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका अहवालानुसार, राष्ट्रीय निवड समितीला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचे 15 खेळाडूंची यादी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कर्णधारपदाचे संभाव्य पर्याय विचारात घेण्याबाबतचा निर्णय जानेवारीमध्येच घेण्यात आला होता.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, “सूर्यकुमार यादवबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी निवड समिती कर्णधारपदाचे विविध पर्याय पडताळून पाहत आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन हे या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत असले, तरी उपकर्णधार अक्षर पटेल याच्या नावावरही चर्चा सुरू आहे. शिवाय, ‘सूर्या’ला आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी आणखी एक संधी द्यायची की नाही, याचाही समिती विचार करत आहे. निवड समितीच्या पुढील बैठकीदरम्यान हे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.”
सूत्रांनी पुढे सांगितले, “आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात ‘सूर्या’चा समावेश नसेल, असे जानेवारीमध्येच ठरवण्यात आले होते. सध्या, एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीवरच मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा सर्वात मजबूत संघ पाठवायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल.”
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी, पुढील आठवड्यात निवड समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान, आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यासाठीचे टी-20 व एकदिवसीय संघांचे तसेच, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठीचा भारत ‘अ’ संघ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा अंतिम संघ निश्चित केला जाण्याची अपेक्षा आहे. या बैठकीदरम्यान सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबतही विशेष चर्चा होईल, असे समजते. गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी अपेक्षांनुसार झालेली नाही. शिवाय, या वर्षीच्या आयपीएल हंगामातही त्याला विशेष छाप पाडता आली नाही.
Comments are closed.