वैभव सूर्यवंशीवर डोळे वटारणाऱ्या काइल जेमिसनला बीसीसीआयने शिकवला धडा! दिली 'ही' शिक्षा

आयपीएल २०२६ मध्ये शुक्रवारी (१ मे) सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगला. यामधील डीसीच्या काइल जेमिसनला बीसीसीआयने सक्त ताकिद दिली. त्याचबरोबर त्याच्या नावावर एक डिमेरिट पॉइंटचीही नोंद केली आहे. त्याने ही शिक्षा मान्य केली असून त्याला ही शिक्षा का झाली हे जाणून घेऊ.

न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाला कलम २.५ अंतर्गत स्तर १ च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले. हे कलम ‘अशा भाषेचा, कृतींचा किंवा हावभावांचा वापर करण्याची संबंधित आहे, ज्यामुळे दुसऱ्या खेळाडूचा अपमान किंवा त्याच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकते’. सामनाधिकारी राजीव सेठी यांनी ही शिक्षा दिली.

झाले असे की आरआरची फलंदाजी सुरू असताना दुसऱ्याच षटकात जेमिसनने टाकलेला चेंडू जो अचूक यॉर्कर होता आणि त्यावर युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी बाद झाला. वैभव २ चेंडूत ४ धावा करत तंबूत परतला, मात्र त्यानंतर जे झाले त्याची अधिक चर्चा सुरू झाली. वैभव बाद झाल्यानंतर जेमिसनने केलेल्या जल्लोषाने सर्वांचे लक्ष वेधले.

जेमिसनने वैभव बाद झाल्यानंतर आक्रमकपणे टाळ्या वाजवून आंनद साजरा केला. तसेच त्याने वैभवजवळ जात आक्रमकपणे त्याच्या डोळ्यात पाहिले. १५ वर्षीय फलंदाजाला दिलेला हा निरोप चिथावणीखोर मानला गेला. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून सोशल मीडियामार्फत चाहते जेमिसनवर टीकाही करत आहेत.

या सामन्यात आरआरने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ध्रुव जुरेच्या ४२ धावा (३०), कर्णधार रियाम परागच्या ९० धावा (५०) आणि डोनोवन फेरेराच्या नाबाद ४७ धावा (१४) यांच्या जोरावर आरआरने २० षटकात ६ विकेट्स गमावत २२५ धावसंख्या उभारली. जेमिसनने ४ षटकात ४८ धावा देत १ विकेट घेतली. आपला या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने ४ षटकात ४० धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात डीसीकडून केएल राहुलने प्रभावी कामगिरी केली. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७५ धावा केल्या. हा सामना डीसीने ५ चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक राखत जिंकला.

Comments are closed.