बीड कलेक्टर ॲक्शन मोडवर; राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचा फोटो झळकल्यास गुन्हा, होर्डि
बीड गुन्हा: मागील काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपींचे फोटो मुख्य चौकातील बॅनरवर झळकले होते. तर पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान अनधिकृत बॅनरचा विळखा देखील पाहायला मिळाला.. अजित दादांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचे होर्डिंग वर फोटो लावल्यास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट…
नेत्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा बॅनरवर गुन्हेगार झळकले
मागील सात महिन्यांपासून बीड जिल्हा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यात चर्चेत आहे. आणि याच बीडमध्ये नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्ते यांचे फोटो झळकले होते. या होर्डिंगची राज्यभर चर्चा देखील झाली होती. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर प्रशासनाने काही बॅनरवर कारवाई केली. मात्र तोपर्यंत प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी होती का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता..
बीड कलेक्टर ॲक्शन मोडवर
देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं.. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घेतले.. अजितदादा येणार असल्याने कार्यकर्त्यांची बॅनरबाजीसाठी हमखास चढाओढ पाहायला मिळते.. अजितदादांच्या बॅनरसाठी शेकापच्या माध्यमातून लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात आले होते.. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा देखील दिला होता.. हीच बाब लक्षात येताच अजितदादांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी करत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.. याच सूचनेनुसार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अजित दादांच्या 15 ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी आदेश काढून कोणत्याही सार्वजनिक फलकावरील मजकूर पक्षेपार्ह नसावा.. गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, गुन्हेगारांचे फोटो त्यावर नसावेत.. असा थेट कागदोपत्री आदेशच काढला आहे…
अजित दादांनी केलेल्या सूचना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.. कार्यकर्ता उत्साहाच्या भरात बॅनर लावतो. मात्र त्यावर कुणाचे फोटो टाकायचं? हे लक्षात येत नाही. हा निर्णय स्वागतार्ह असून या आदेशाचे पालन केले जाईल.. असं स्वतः अजितदादांच्या तालुकाध्यक्षांनी सांगितले…
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?
1) सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेची काळजी
2) फलक बॅनर्स लावण्यापूर्वी मजकुराची पडताळणी आवश्यक
3) अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई केली जाणार
4) सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होणारे फलक बॅनर्स नसू नये अन्यथा यावर कार्यवाही होणार
5) बॅनर लावताना जातीय व धार्मिक भावना लक्षात घेणे आवश्यक आहे..
आपल्या स्पष्ट आणि परखड स्वभावाने अजितदादा ओळखले जातात.. मागील पंधरा दिवसातील अजितदादांचा आता हा दुसरा दौरा असणार आहे… तत्पूर्वीच प्रशासनाला काही अंशी का होईना.. शिस्त लागल्याचं दिसून येतंय.. मात्र राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे…
आणखी वाचा
Comments are closed.