खासदार बजरंग सोनवणेंच्या पीएवर गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप
बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात धनंजय धसे (Dhananjay Dhase) आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे (Devashish Dhase) यांच्याविरोधात तब्बल साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून काम पाहत असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार भरत नवनाथ खेडकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 2016 मध्ये धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष यांनी खेडकर यांच्याशी संपर्क साधून “तुम्हाला शेत तलावाच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देतो आणि आपण पार्टनरशिपमध्ये हे काम करू,” अशी ऑफर दिली.
त्यावर विश्वास ठेवून खेडकर यांनी त्यांच्याकडे एकूण 13.5 लाख रुपयांची रक्कम दिली. मात्र, आजतागायत ना टेंडर मिळाले, ना पैसे परत करण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खेडकर यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धसे पितापुत्रांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण
दरम्यान धनंजय धसे हे सध्या खासदार बजरंग सोनवणे यांचे दिल्लीतील कार्यभार पाहतात, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असता “धनंजय धसे हे आमच्याकडे ऑन रेकॉर्ड कुठल्याही अधिकृत पदावर नाहीत. ते आमचे स्वीय सहाय्यक नाहीत,” असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तरीही धसे हे दिल्ली आणि मुंबईतील कामकाजासाठी उपस्थित असतात, असे कार्यकर्ते सांगत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.