व्याजाने दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक, सावकारीच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणा
बीड क्राईम न्यूज : बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर तालुक्यात सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
धारूर तालुक्यातील गावंदरा येथील धर्मराज बडे (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज बडे यांनी काही दिवसांपूर्वी बालासाहेब कांबळे यांच्याकडून सुमारे 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे हे बडे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पैशांसाठी तगादा लावत कुटुंबीयांविषयी अपमानास्पद व अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे.
Beed Crime News: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
या प्रकारामुळे धर्मराज बडे मानसिक तणावात होते. अखेर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आणत जोपर्यंत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले.
Beed Crime News: सावकारावर गुन्हा दाखल
जवळपास चार ते पाच तास पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत बालासाहेब कांबळे, कांताबाई कांबळे आणि भागवत वेताळ यांच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून सावकारीच्या त्रासामुळे झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Beed Bribe News: तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; परळी तहसीलसमोर नागरिकांनी फोडले फटाके
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्यानंतर तहसील कार्यालयासमोर नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कन्हेरवाडी येथील शेतकरी हनुमंत फड यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करत असूनही काम होत नव्हते. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. परळीत अनेक ठिकाणी अशाच तक्रारी असून मराठी सांगतील त्यांचीच कामे केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अधिकाऱ्यांची मनमानी थांबली पाहिजे आणि सामान्य नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.