किरकोळ वाद विकोपाला, पाच जणांवर प्राणघातक हल्ला; बीड जिल्ह्यातील अमळनेर हादरलं!

बीड क्राइम न्यूज: बीडच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमळनेर येथे पाच जणांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला (Crime News) करण्यात आला. यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उभ्या पिकात ट्रॅक्टर का घातले? असा जाब विचारत लाठ्या-कुऱ्हाडीने हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये दोन वृद्धांसह इतर तिघे जखमी असून एका महिलेचा ही यात समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

बावधन नाक्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी

दरम्यान अशीच एक घटना वाईचा बावधन नाका येथे घडली आहे. काल रात्री (19 मे) उशिरा भर पावसात काही युवक बावधन नाका परिसरात एकत्र जमले आणि काही समजायच्या आतच जोरदार मारामारीला सुरुवात झाली. दृश्य इतकं धक्कादायक होतं की रस्त्यावरची वाहतूक थांबून गेली. लोकं बघ्याची भूमिका घेत उभी राहिली, तर काहींनी पोलिसांना फोन केला.पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत रस्त्यावर अक्षरशः फायटिंगचा फिल्मी सेट उभा राहिला होता!

बावधन नाका वाईचा बीड होतोय का काय?

दरम्यान, हाणामारी मागचे नेमकं करण काय? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेनंतर वाईकरांमध्ये चर्चा रंगली आहे. या आधीही बावधन नाक्यावर अशा प्रकारच्या घटना घडल्या असून स्थानिकांनी याविरोधात मोर्चा देखील काढला होता. तरीही पुन्हा एकदा हे ठिकाण अशा कारणांनी चर्चेत येतंय, ही बाब निश्चितच चिंतेची आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी video फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे..

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.