बीडमध्ये सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, प्रियकराने विष पिऊन जग सोडलं, विरह
बीड क्राईम न्यूज : सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक शेवट अंबाजोगाई येथे झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल पवार (वय 21)याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.
Beed Crime News: बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं
दरम्यान, आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला. तर आपला प्रियकर (नात्याने सावत्र मुलगा) अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर गोळीबार प्रकरणात आत्तापर्यंत आठ आरोपींना बेड्या
दरम्यान, उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात झालेल्या गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून झालेल्या या घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. उल्हासनगर गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाइन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली. पुढील तपासात 26 मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकमला अटक करण्यात आली आहे. बुधवारी या चौघांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.