परळीमध्ये 1992 पासून सत्ता; या सत्तेची मस्ती अनेकांना आली, खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली शिवराज
बीड: संतोष देशमुख प्रकरणानंतर अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मात्र, तरीदेखील बीड आणि परळीतील गुंडाराज संपलं नसल्याचं चित्र आहे. परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने आपल्या भांडणात सहभागी असल्याच्या संशयावरून एका तरुणाला उचलून जवळच्या जंगलात नेलं. तिथे त्याला 10 ते 12 जणांनी लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात घडली. विषेश म्हणजे आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओही बनवला. शिवराज नारायण दिवटे (वय 18) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंंतर पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार बजरंग सोनवणेंनी पीडित युवक शिवराज दिवटे याची आज भेट घेतली, त्याचबरोबर त्याच्या वडिलांशी देखील चर्चा केली.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे यांची भेट घेतली. दोन दिवसापूर्वी शिवराज दिवटे याला परळी जवळच्या टोकवाडी शिवारात अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. तेव्हापासून शिवराज दिवटे यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवराज यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्याचे वडील नारायण दिवटे यांच्याशी देखील चर्चा केली. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत.
परळी मध्ये 1992 पासून सत्ता, या सत्तेची मस्ती
बीडच्या खासदार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सोनवणे यांनी करत बीड जिल्ह्यात वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी व त्याला काही कर्मचारी अशा पद्धतीने नियुक्ती करावी या मागणीसाठी मी उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. याबरोबरच परळीमध्ये 1990 – 92 पासून सत्ता आहे आणि सत्तेची मस्ती अनेकांना आली आहे, त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचे असल्याचे आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला. या प्रकरणात बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी केली आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह राजेसाहेब देशमुख, अमर देशमुख याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार ) गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
मारहाण प्रकरणी उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (सोमवारी) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याचा बंद हा शांततेत होणारा असून हा बंद कोणा एकाचा नाही. शांतता प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत असे व्हिडिओ व्हायरल होणे थांबले पाहिजे. यामुळे बीडची तुलना बिहार शी केली जात आहे हे थांबल पाहिजे म्हणून उद्याचा बंद आहे. बीड जिल्ह्याचे नाव खराब न होण्यासाठी आणि बीडची गुन्हेगारी थांबवण्यासाठी हा बंद करण्यात येणार आहे.गुन्हेगाराला कुठलाही जात धर्म नसतो म्हणून हा बंद आम्ही अठरापगड जातीचे लोक एकत्र येऊन करणार आहोत, अशी माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.