दोन मैत्रिणींचा एकाच बाॅयफ्रेंडवरून वाद पेटला; मैत्रिणीनं मुलाच्या मदतीनं महिला होमगार्डचा गळा
बीड : गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्या (Beed Crime News) घटनांमुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या (Beed Crime News) घटनाने जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर परळी तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच कोयत्याने वार केले, या दोन्ही प्रकरणांमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुनाच्या या दोन घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)
प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवलं
बीड शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती.
दरम्यान, अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात तीव्र राग निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरात बोलावून घेतले. तेथे आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला.
यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून फडताडेच्या मुलाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली. त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकण्यात आला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले.
कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच कोयत्याचे वार
परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा परिसरामध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अनिल बाबासाहेब चव्हाण (वय 30) याने त्याचा मेहुणा भीमराव शिवाजी राठोड (वय 26) याच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने सपासप वार करून संपवलं. आरोपीस सोनपेठ येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक गोष्टीतून अनिल चव्हाण आणि भीमराव राठोड यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणातून चिडलेल्या अनिलने भीमराव यांच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळी फरार झाला होता. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अनिल याला सोनपेठ येथून ताब्यात घेण्यात आलं. सिरसाळा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव राठोड यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी अंबाजोगाई येथील रुग्णालयात करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.