कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनीचे लैंगिक छळ प्रकरण; शिक्षक पवार आणि खाटोकरवर दुसरा गुन्हा दाखल

बीड क्राइम न्यूज: बीड शहरातील उमीकरण संकुलनातील कोचिंग क्लासेसमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ (Crime News) प्रकरणी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान दुसऱ्या पालकाने लैंगिक छळाची (Beed Sexual Harassment case) तक्रार दिल्यानंतर आता शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आरोपी पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पालकाच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

पवार आणि खाटोकर यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालीय. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली होती. दरम्यान बीड न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले होते. या दोघांना यापूर्वी दोन दिवस आणि त्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले आहेत. शनिवारी प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बीडमध्ये बाललैंगिक अत्याचारांचे 78 गुन्हे

बीडमध्ये शाळा, क्लासेस आणि अगदी घरातही मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक दोन दिवसांनी एक बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची जिल्ह्यात नोंद होतेय. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे नोंद झालेत. यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. धक्कादायक म्हणजे पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत.

रूपाली चाकणकर यांनी घेतली पीडित विद्यार्थिनीची भेट

दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात पीडित विद्यार्थिनीची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. यावेळी विद्यार्थिनीची भेट घेऊन चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्राप्त केली. बीडमधील घटना गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. 26 जूनला गुन्हा दाखल झाला. फरार होण्यास आरोपींना मदत करण्यात आली आणि 29 जूनला अटक करण्यात आली. मोबाईल, लॅपटॉप, सीसीटीव्ही जप्त करावे, इतर विद्यार्थिनी यांना अशा पद्धतीच्या कृत्याचा सामना करावा लागला असेल तर तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.