तू आमचा वाद का मिटवतोस? भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
बीड गुन्हा: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शस्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहाणी यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बीडमध्ये गुन्हेगारीचं मूळ अधिक खोलवर रुजल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed Crime)
भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला “तू आमचा वाद का मिटवतोस?” असा सवाल करत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना भेंड टाकळी (ता. गेवराई) येथे घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश वाव्हाळ असे असून, या प्रकरणी तिघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
गावातील दोन भावांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे गांभीर्य वाढत असल्यामुळे सतीश वाव्हाळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद सोडवण्याच्या हेतूने गेलेल्या सतीश यांच्यावरच तिथे उपस्थित असलेल्या तिघांनी राग काढला. “तू आमच्या वादात का पडतोस?” असा जाब विचारत त्यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यात सतीश वाव्हाळ गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. मारहाणीच्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात मारहाणी, वादविवाद आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.