बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

बीड क्राइम विलास घुले प्रकरण: बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे घडलेल्या विलास घुले हत्याकांडाला (Vilas Ghule Case) आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. 21 जून रोजी उमेश माने या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणामागे केवळ वाद नसून, महिला छळ, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचे गंभीर कारण असल्याचा धक्कादायक आरोप एका स्थानिक महिलेने काही दिवसांपूर्वी केला होता. ज्या उमेश मानेला वाचवताना विलासचा जीव गेला, त्याच उमेश मानेविरुद्ध आता केज पोलीस ठाण्यात अत्याचार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी उमेश माने याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला आणि या संपूर्ण प्रकाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला. जेव्हा तिचे कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले, तेव्हा रमेश घुले नावाच्या व्यक्तीने त्यांना वाटेतच अडवले. “यापुढे उमेश त्रास देणार नाही, याची गॅरंटी माझी, पण पोलिसांत गेलात तर गाठ माझ्याशी आहे,” अशी धमकी दिल्याने भीतीपोटी कुटुंबाने पोलीस तक्रार केली नाही आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी शेतातील घर सोडून गावात राहणे पसंत केले.

Beed Crime Vilas Ghule Case: बुलेट आणि स्कॉर्पिओने येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

गावात राहायला गेल्यानंतरही पीडित महिलेचा छळ थांबला नाही. विलास घुले आणि उमेश माने हे दोघे बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वारंवार पीडितेच्या घराभोवती चकरा मारायचे. 3 जून रोजी विलास घुले याने पीडितेच्या घरात घुसून, “तू उमेशसोबत पूर्वीसारखेच संबंध ठेव, नाहीतर तुझ्या पतीला आणि मुलांना जीवे मारीन,” अशी थेट धमकी दिली.

त्यानंतर 20 जूनच्या रात्री विलास आणि उमेश पुन्हा तिच्या घरासमोर आले. त्यांनी जोरात गाडीचा हॉर्न वाजवून शिवीगाळ सुरू केली. पीडितेच्या पतीने बाहेर येऊन “आम्हाला सुखाने जगू द्या” अशी विनंती केली असता, आरोपींनी “तू बाहेर ये, तुला खल्लास करतो,” अशी धमकी दिली.

Beed Crime Vilas Ghule Case: …अन् हॉटेलवर घडले हत्याकांड

यानंतर आरोपींना समजावून सांगण्यासाठी पीडित महिलेचे वडील, पती आणि इतर नातेवाईक एका हॉटेलवर गेले होते. मात्र, तिथे चर्चा करण्याऐवजी विलास आणि उमेशने काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी पीडितेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढवला. “आरोपींनी आधी बेदम मारहाण सुरू केल्यामुळे स्वतःच्या बचावासाठी माझ्या वडिलांनी हात उचलला आणि याच झटापटीत विलास घुलेचा मृत्यू झाला,” असा दावा पीडित महिलेने केला आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: उमेश मानेविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर बीड जिल्हा चांगलाच तापला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तब्बल तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, तर विलासचा मृतदेह 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवला होता. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला पोलिसांनी पीडितेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला होता, मात्र आता केज पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून उमेश मानेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या नव्या खुलाशामुळे पोलीस प्रशासनासमोर तपासाचे एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर तुकाराम मुंढेंच्या FDA ची ॲक्शन; पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

Comments are closed.