वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमद
बीड गुन्हा: संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड कारागृहात असला तरी शहरात वाल्मिक कराडच्या गँगची दहशत तसूभरही कमी झाली नसल्याचं चित्र आहे . गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या चेल्यांचे अघोरी कृत्य, सोशल मिडियावर ‘वाल्मिक अण्णा ‘ च्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत असताना कराड समर्थकांकडून दमदाटी करत तरुणाला हात जोडत माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे .यात ‘ वाल्मीक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही .माझ्याकडून झाली ती चूक झाली ‘ असं म्हणत एक तरुण हात जोडून माफी मागताना दिसत आहे .
बीडच्या गुन्हेगारीचे वारंवार व्हायरल होणारे एक एक व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत . दमदाटी, शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शिवीगाळ मारहाण, अघोरी कृत्य करताना व्हिडिओ करून व्हायरल केले जात आहेत . त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे .असे व्हिडिओ वारंवार समोर येत असताना पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा आहे .
नेमकं प्रकरण काय ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मीक कराड बीड कारागृहात आहे . वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपापासून ते शहरात वाल्मीक कराडच्या गॅंग ची दहशत महादेव मुंडे प्रकरणात होणारे गंभीर आरोप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत . दरम्यान ‘पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णा शिवाय पर्याय नाही .माझी झाली ती चूक झाली ‘ असे एका तरुणाला हात जोडून म्हणायला भाग पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . दरम्यान वाल्मीक गँगने तरुणाला हात जोडण्यासाठी शिवीगाळ केलेला आहे या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे .
या व्हिडिओमध्ये दमदाटी करणारे वाल्मीक कराडचे समर्थक असल्याची माहिती आहे .नेमका हा तरुण कोण होता याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही .हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तसेच या दमदाटीच्या प्रकाराबाबत संबंधित तरुणाची कुठली तक्रार नोंदवली होती का ?हे अद्याप अस्पष्ट असले तरी वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांच्या दहशतीचा आणखी एक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्याने शहरात भीतीच वातावरण आहे .दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत असून वाल्मीक कराडच्या गॅंगला कोणी व कसे थोपवायचे हा सवाल कायम आहे .
आणखी वाचा
Comments are closed.