बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील घटना


बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, जिल्हा पोलीस प्रमुख बदलले पण बीडमधील मारहाणीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. गेवराई तालुक्यात अशीच एक घटना घडली असून नांदगाव ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. जालिंदर सुरवसे असं ग्रामसेवकाचं नाव असून त्याला गावगुंडांनी मारहाण केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

ग्रामसेवकाला करण्यात आलेली मारहाण ही जबर होती. त्यामध्ये ग्रामसेवकाच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले आहे, त्याचे शरीर काळे-निळे पडल्याचं दिसून आलं. तसेच त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत ही मारहाण करण्यात आली. लाथा बुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांना ही मारहाण झाली आहे. ग्रामसेवकाला गावगुंडांनी का मारहाण केली याची माहिती मात्र समोर आली नाही.

याप्रकरणी सध्या तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जालिंदर सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सुरवसे यांची आई आणि बहीण यांच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्याला टोळक्याकडून मारहाण

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच असून असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील रायमोह येथे अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

शाळेच्या गेटबाहेरच विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असताना पोलिस प्रशासनाची भूमिका किती प्रभावी आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यातील सततच्या मारहाणीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद होत असून नागरिकांकडून कठोर उपाययोजनांची मागणी वाढत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.