मोठी बातमी! महादेव मुंडे खून प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

बीड महादेव मुंडे केस बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग केल्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलीय. या पथकात एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 18 महिन्यांपूर्वी खून झाला होता. मात्र या खून प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी (Dyaneshwari munde) यांच्याकडून या प्रकरणात न्याय मिळावा. या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या पतीच्या खून प्रकरणात न्याय मिळावा. यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  दरम्यान पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत तपासाची चक्र फिरवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास दिल्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलीय. या प्रकरणात आठ तपासाधिकारी बदलण्यात आले. किमान आता तरी मुंडे कुटुंबाला न्याय मिळतो का? हाच सवाल आता विचारला जात आहे.

न्यायासाठी 25 तारखेला ग्रामस्थांचा परळी-अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आता कन्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या 25  जुलै रोजी गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीची नेमणूक करून चौकशी करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी रास्ता रोकोमध्ये करण्यात येणार आहे.

पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे गाव असलेले कान्हेवाडी आणि महादेव मुंडे यांचे गाव असलेले भोपळा गावचे ग्रामस्थ न्यायासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबतचे एक निवेदन देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने उलटूनही या प्रकरणातील एकही आरोपी अटक झाली नसल्यामुळे आधी महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आक्रमक झालेले दिसून आले होते. त्यानंतर काल मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिलाय.

… अन्यथा बीडसह राज्यभरात आंदोलन करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

महादेव मुंडे यांचा खून होऊन 21 महिने उलटले तरी देखील तपास लागला नाही, मुख्यमंत्र्यांना गुंडच पोसायचे आहेत का, आता या प्रकरणात येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त करावी. अन्यथा बीडसह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणात जे कोण पोलिस अधिकारी, कर्मचारी होते त्यांचे कॉल डिटेल्स देखील तपासायला हवेत. आता मी या प्रकरणात लक्ष दिले आहे, काय-काय होते ते तुम्हाला दिसेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत फोनवरुन चर्चा देखील केली.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.