अल्पवयीन मुलीवरील हल्ला, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल

बीड वार्ता: बीडच्या दादाहरी वाडगावमध्ये (Dadahari Wadgaon in Beed) धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. परळीतील आयटीआय कॉलेजच्या मागील डोंगर परिसरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आकाश राम खाटीक (Akash Ram Khatik) असे युवकाचे नाव आहे. दरम्यान मयत युवकाविरुद्ध परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात (Parli Vaijanath Rural Police Station) दोन दिवसांपुर्वी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात तो फरार होता. दरम्यान, या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीवरील हल्ला आणि त्यानंतर आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल

दादाहरी वाडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर हा आरोपी फरार झाला होता. यातच त्याच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला होता. अल्पवयीन मुलीवरील हल्ला आणि त्यानंतर या युवकाने केलेल्या आत्महत्येमुळे या प्रकरणाची गंभीर चर्चा परिसरात होत आहे. परळीतील आयटीआय कॉलेजच्या मागील डोंगर परिसरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन मृतदेह ताब्यात घेतला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Beed Crime : बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांना संपवलं

बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवन येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीकिसन कोठुळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी मुलगा फुलचंद कोठुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कोठुळे कुटुंबात कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होता. त्यावेळी श्रीकिसन कोठुळे हे भांडण सोडवण्यासाठी आले होते. यावेळी फुलचंद कोठुळे यांनी अंगणात पडलेली वीट त्यांच्या डोक्यात मारली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने श्रीकिसन कोठुळे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फुलचंद कोठुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.