ईडन गार्डन्सवर मोहम्मद शमीची भन्नाट बॉलिंग, बंगाल टी20 लीगमध्ये हॅट्ट्रीक घेत निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर!
कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर शनिवारी (६ जून) बंगाल टी२० लीग २०२६ मध्ये सर्वोटेक सिलीगुडी स्ट्रायकर्सकडून खेळताना, अनुभवी पण संघाबाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक सनसनाटी हॅटट्रिक नोंदवली. स्पर्धेतील केवळ तिसऱ्याच सामन्यात शमीच्या या तडाख्याचा फटका श्राची राढ टायगर्सला बसला.
शमीने १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शहबाद अहमदला बाद केले, त्यानंतर अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर रोहित कुमार आणि दिपांजन मुखर्जी यांना बाद करत आपली प्रादेशिक (regional) हॅट्ट्रीक पूर्ण केली. २०२५ च्या सुरूवातीला आपला शेवटचा वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या ३५ वर्षीय या अनुभवी गोलंदाजाने २७ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिलिगुडीने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या. विशाल सुनील भाटीने ४६ चेंडूंत ८६ धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्याला प्रमोद चंडीलने ३६ धावा करत योग्य साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करण्यात उतरलेल्या राढ टायगर्सने कडवी झुंज दिली, मात्र त्यांना रोखण्यात सिलिगुडीला यश आले. राढ टायगर्स ९ विकेट्स गमावत १८४ धावा करू शकला आणि हा सामना सिलिगुडीने २४ धावांनी जिंकला.
शमीने २०१९ च्या वनडे विश्वचषकातही हॅट्ट्रीक घेतली होती. अफगाणिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात त्याने मोहम्मद नबी , आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना बाद केले होते. वनडे विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा तो चेतन शर्मा यांच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२६ मध्ये शमी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला. त्यामध्ये त्याने १३ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात निवडण्यासाठी दुर्लक्षित केले गेले. अजित आगरकर यांच्या निवड समितीला शमीच्या फिटनेसबद्दल आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी करू शकेल की नाही याची खात्री नाही.
शमीने भारतासाठी शेवटचा सामना ९ मार्च, २०२५ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला.
Comments are closed.