लग्नास टाळाटाळ, खासगी फोटो-व्हिडीओवरून धमकी; प्रियकराने प्रेयसीला तिसऱ्या मजल्यावरून ढकलले, उपचारादरम्यान मृत्यू – TMarathiNews

बंगळुरू : लग्न करण्यास टाळाटाळ करणे आणि खासगी फोटो-व्हिडीओवरून धमकावणे या कारणांवरून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीला हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. या घटनेत 26 वर्षीय ऐश्वर्या या तरुणीचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे हे प्रकरण हत्येचे असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी संतोष नामक आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ऐश्वर्या ही हासन येथे राहणारी असून एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचे संतोषसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, संतोष लग्न करण्याबाबत सतत टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. संतोषकडे ऐश्वर्याचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ होते. त्यांचा वापर करून तो तिला धमकावत असल्याचा आरोप आहे. याच फोटो आणि व्हिडीओच्या आधारे त्याने ऐश्वर्याला भेटण्यासाठी बोलावले होते.

19 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या कामाच्या मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती संतोषला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर दोघे एका लॉजमध्ये थांबले. तेथे त्यांनी मद्यपान केले. याचदरम्यान दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वाद सुरू झाला. ‘ना माझा तुझ्यावर विश्वास आहे, ना माझ्या कुटुंबाचा,’ असे ऐश्वर्याने संतोषला सांगितले. वादाच्या भरात तिने आपण जीव देऊ, अशी धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे.

यावर संतोषने तिला ‘जे करायचे ते कर’ असे म्हणत तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली ढकलल्याचा आरोप आहे. खिडकीतून खाली पडताना ऐश्वर्या एका विजेच्या खांबावर आदळली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

या घटनेचा एक महत्त्वाचा पुरावा सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पोलिसांच्या हाती लागला आहे. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी एक तरुणी इमारतीवरून खाली पडताना या फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आत्महत्या म्हणून नोंद केली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. ऐश्वर्याला स्वतःहून उडी मारण्याऐवजी खिडकीतून ढकलण्यात आल्याचे पुरावे समोर आल्याने प्रकरणाला हत्येचे स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, ऐश्वर्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोषला अटक केली आहे. खासगी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून धमकावणे तसेच वादातून तरुणीला खाली ढकलल्याच्या आरोपांबाबत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.