बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; एकनाथ शिंदे हसले अन् म्हणाले…

मराठी On BEST Election Result मुंबई: सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल (Best Election Result) समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले.

यंदाच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. ठाकरे बंधूंच्या या दारुण पराभवावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करत असते, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

पुढे जाणार,मागे जाणार हे जनता ठरवते,जे काम करतात त्यांना जनता पुढे नेणार, जे घरी बसतात त्यांना लोक घरी बसवतात. सर्व स्पीडब्रेकर काढून टाकले आम्ही त्याचे काम वेगाने सुरू आहेत. ही निवडणूक बॅलेटवर झाली,इथे काय बोलणार? इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगले… बेस्ट पतपेढीच्या या निवडणुका बॅलेटवर होत्या. आता इथे काय बोलणार? त्यांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला. आता ब्रँडचे बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, जनता ही सर्वात महत्वाची आहे, ती ठरवत असते, त्यांनी जे ठरवलं ते आता झाले, असं एकनाथ शिंदे हसत-हसत म्हणाले. जनतेने आम्हाला पाठिंबा दिला म्हणून आम्ही 80 लढून 60 जागा जिंकलो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाकरे ब्रँड कोमात स्वदेशी देवाभाऊ जोमात-

बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय. दादर सेनाभवन परिसरात भाजपने जोरदार बॅनरबाजी केलीय. ठाकरे ब्रँड कोमात स्वदेशी देवाभाऊ जोमात, असं या फलकावर नमूद करण्यात आलंय. नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सपशेल पराभव झाला होता. सर्वच्या सर्व 21 जागांवर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या होत्या. तर शशांक राव यांच्या पॅनेलला 14 जागा मिळाल्या.

https://www.youtube.com/watch?v=Q3B2UOZQEFU

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आणखी वाचा

Comments are closed.