17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी?

कोलकाता: देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या निकालात भाजपने (BJP) चांगलीच मुसंडी घेतली असून तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामध्ये, ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने द्विशतकाच्या जवळपास मजल मारली आहे. तसेच, पद्दुचेरी आणि आसाम राज्यातही भाजपने सत्तेच्या चाव्या मिळवल्या आहेत. मात्र, देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. बंगालमध्ये (West bengal) गेल्या 15 वर्षे असलेल्या सत्तेला भाजपला सुरुंग लावला असून स्वत: ममता बॅनर्जी देखील पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. येथे भाजपकडून शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध मैदानात आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली असून 17 व्या फेरी अखेर ममता बॅनर्जी 6 हजारांच्या मताधिक्याने पिछाडीवर गेल्याने तृणमूल काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. 17 व्या फेरीत मतमोजणीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी 6 हजार 226 मतांची आघाडी घेतल्याने ममता बॅनर्जी यांनीही मतमोजणी केंदातून काढता पाय घेतला. 17 व्या फेरीअखेर शुभेंदू अधिकारी 60954 मतांसह 6226 मतांनी आघाडीवर आहेत. तर, ममता बॅनर्जी 54,728 मतांसह -6,226 मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघात निर्णायक कौल काय मिळतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ममता बॅनर्जी मतमोजणी केंद्रावरुन निघून गेल्या

मतमोजणी केंद्राच्या बाहेर मिळालेल्या माहितीप्रमाणे, 16 व्या फेरीतच सुवेंदू अधिकारी 563 मतांनी आघाडीवर गेले होते. 16 व्या फेरीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मोठं मताधिक्य घेत ममता बॅनर्जी यांची आघाडी कापून काढत स्वतः आघाडी घेतली. ममता बॅनर्जी मतमोजणी केंद्राच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने निघून गेल्या आहेत. सुमारे तीन तास मतमोजणी केंद्रावर थांबल्यानंतर ममता बॅनर्जी येथून निघून गेल्या आहेत. त्यामुळे, ममता यांना आपला पराभव दिसत असल्यानेच त्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा मतमोजणी केंद्रावर रंगली होती. आता, ममता दीदी आपल्या घरी जाणार, पक्षाच्या कार्यालयात जाणार की राजभवनात जाणार हे स्पष्ट नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

भाजपची रणनीती, शुभेंदू अधिकारी यांचं योगदान

भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते. तसंच या विजयाचं मोठं श्रेय शुभेंदु अधिकारींनाही जातं. पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच. पण, बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात शुभेंदु अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. “अंग-बंग आणि कलिंग” अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्नही यानिमित्तानं पूर्ण झालं.

हेही वाचा

विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला

आणखी वाचा

Comments are closed.