निकोलस पुरनचं वादळ! ठरला अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांनी मिळून दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करताच त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

निकोलस पूरन हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण या हंगामात त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. तो आतापर्यंत एकही मोठी खेळी करू शकला नव्हता. पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जोस इंग्लिस स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने मिळून लखनौचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून ७ व्या षटकात लखनौ संघाची धावसंख्या १०० धावांवर पोहोचवली. यादरम्यान निकोलस पूरनने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं लखनौ सुपर जायंट्स संघासाठी आयपीएल स्पर्धेतील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. यासह २० पेक्षा कमी चेंडूंचा सामना करून सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

निकोलस पूरनने मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना अवघ्या २१ चेंडूत १ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने ६३ धावांची खेळी केली. त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण कॉर्बिन बॉशने त्याला बाद करत माघारी धाडलं. या खेळीदरम्यान त्याने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह आयपीएल स्पर्धेत २० पेक्षा कमी चेंडूंचा सामना करून झळकावलेलं त्याचं पाचवं अर्धशतक ठरलं. या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावे ६ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या वैभव सूर्यवंशीच्या नावे ४ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे.

Comments are closed.