निकोलस पूरनचा वानखेडेवर तुफान! अवघ्या 9 चेंडूत 52 धावा; वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे

आयपीएल 2026 च्या 47व्या सामन्यात, निकोलस पूरनने अशी काही धडाकेबाज खेळी केली की, मुंबई इंडियन्सचे गोलंदाज केवळ प्रेक्षक बनून राहिले. वानखेडे स्टेडियमवर, पूरनने केवळ 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून गोलंदाजांची धुलाईच केली नाही, तर या दरम्यान त्याने वैभव सूर्यवंशीलाही मागे टाकले. लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना, पूरन आणि मिचेल मार्श यांनी पॉवरप्ले दरम्यान अशी काही धुमाकूळ घातली की, मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसून आले. प्रथम फलंदाजी करताना, लखनऊने सुरुवातीच्या सहा षटकांत केवळ एका गड्याच्या बदल्यात 90 धावा उभारल्या. जी केवळ या हंगामातीलच नव्हे, तर आयपीएलच्या संपूर्ण इतिहासातील त्यांची पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

पूरनने पॉवरप्लेमध्येच पाच षटकार ठोकले आणि मुंबईच्या गोलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली. त्याची खेळी इतकी स्फोटक होती की, लखनऊच्या चाहत्यांना प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव होण्याची अपेक्षा वाटू लागली. पूरनने केवळ 21 चेंडूंमध्ये 63 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यातील 52 धावा त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्येच काढल्या होत्या. आपल्या या वादळी खेळीत त्याने आठ षटकार आणि एक चौकार लगावला. जरी तो नवव्या षटकाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला असला, तरी तोपर्यंत लखनऊ सुपर जायंट्सने धावफलकावर १२३ धावांची भक्कम धावसंख्या आधीच उभारली होती.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना निकोलस पूरनचे हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही पूरनच्याच नावावर आहे. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना, त्याने केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा हा उल्लेखनीय पराक्रम गाजवला होता. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा खेळाडू म्हणून त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले. या विशेष यादीत वैभव सूर्यवंशीला मागे टाकले.

आयपीएलमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे फलंदाज

6 – अभिषेक शर्मा
5 – निकोलस पूरन
4 – वैभव सूर्यवंशी

शेवटी लखनऊने आपल्या 20 षटकात 5 गडी गमावून 229 धावा केल्या आहेत. आता मुंबईसमोर 230 धावांचे लक्ष्य आहे.

Comments are closed.