29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन

भंडारा: शहरातील एका व्यक्तीची चक्क बँक (Bank) मनेजरनेच फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील मणप्पूरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनं फसवणूक केल्याचा आरोप करीत भंडाऱ्यातील अमित जोशी यांनी भंडारा (Bhandara) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातचं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भंडाऱ्यात खळबळ उडाली असून पोलीस (Police) अधीक्षकांच्या कार्यालयातच हा प्रयत्न झाल्याने पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची समस्या सोडविण्यात येत नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी या घटनेनंतर तातडीनं विषप्राशन करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण

शहरातील अमित जोशी यांचा मुलगा हिमांशू यांनं महिनाभरापूर्वी मणप्पूरम गोल्ड लोन बँकेत 292 ग्रॅम म्हणजेच जवळपास 29 ते 30 तोळे सोनं गहाण ठेवण्यासाठी आला होता. बँकेत आपल्याकडील 292 ग्रॅम सोने गहाणी ठेऊन, त्यावर सुमारे 18 लाख रुपयांचं कर्जही त्याने घेतलं होतं. मात्र, ज्या कामासाठी त्यांना पैशाची गरज होती, ते काम पुढे ढकलल्यानं बँकेकडून घेण्यात आलेल कर्ज वापरण्यात आलं नाही. त्यामुळे, ती 18 लाख रुपयांची रक्कम बँकेतच होती. मात्र, मणप्पुरम बँकेचा मॅनेजर रोहित साहू यानं जोशी यांच्या खात्यातून ती रक्कम परस्पर फसवणूक करीत स्वतःच्या खात्यावर वळविली. त्यानंतर, भंडारा येथून बँक मॅनेजर साहू हा गायब झाला. साहू यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिल्यानं अमित जोशी यांना शंका आली. त्यामुळे, याप्रकरणी अमित जोशी यांनी 18 ऑगस्टला भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मॅनेजर साहू याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 316 (2), 318 (4) कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भंडारा पोलीस तपास करीत आहेत. मात्र, आपल्या 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने अमित जोशी यांनी आज टोकाची भूमिका घेत चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं पोलीस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या ‘रेड’ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव

आणखी वाचा

Comments are closed.